काश्मिरमध्ये सुधारीत पॅलेट गन वापरणार

0

श्रीनगर। मागील वर्षी काश्मिरमधील हिंसक आदोंलनाच्यावेळीस आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी वापरण्यात आलेल्या पॅलेट गन पुन्हा वापरण्याचा निर्णय निमलष्करी दलांनी घेतला आहे. काश्मिरमधील कुठलेही आंदोलन आणि लष्कराला होणारा विरोध मोडून काढण्यासाठी सुधारीत स्वरुपाची पॅलेट गन वापरण्यात येत असल्याचे केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे महासंचालक दुर्गाप्रसाद यांनी सांगितले. मागील वर्षी जुलै महिन्यात हिजबुलचा कमांडर बुरहान वाणीला मारल्यानंतर काश्मिरमध्ये हिंसाचार उसळला होता. त्यावेळी आदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षादलांनी पॅलेट गनचा वापर केला होता. त्यावेळी पॅलेट गनमुळे शेकडो आंदोलनकर्ते जखमी झाले होते. त्यात काहीजणांच्या डोळ्यांना गंभीर इजा झाल्या होत्या. त्यामुळे पॅलेट गन वापरण्याला झालेल्या विरोधानंतर त्याची जागा मिरचीची पूड असलेल्या पॉवरशेल्सने घेतली होती. पण, या पॉवरशेल्सला आंदोलक घाबरत नसल्याचे लक्षात आल्यावर सुधारीत स्वरुपाची पॅलेट गन वापरण्याचा निर्णय सुरक्षादलांनी घेतला. पॅलेट गनचा वापर करण्यावरून काश्मिरमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर पॅलेट गनला पर्याय देण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने काश्मिरमध्ये पॅलेट गनवर बंदी घालता येणार नाही हे स्पष्ट केले होते. त्याचवेळी केंद्रीय राखीव सुरक्षा दल आणीबाणीच्या परिस्थितीत पॅलेट गनचा वापर करेल हे स्पष्ट केले होते.

गेल्यावर्षीच्या तुलनेत काश्मिरमधील वातावरण खूपच निवळलेले आहे. सुरक्षादलांवर होणार्‍या दगडफेकीचे प्रमाणही खूप कमी झाले आहे. काश्मिरमध्ये गेल्या वर्षी दगडफेकींच्या निरनिराळ्या घटनांमध्ये एकूण 2580 जवान जखमी झाले होता. त्यातील 122 जणांची परिस्थिती खूपच गंभीर होती. सेनेच्या विविध तळांवर 142 वेळा दगडफेक आणि 43 वेळा पेट्रोल अ‍ॅटक, अ‍ॅसिड आणि कॅरोसीनचे बॉम्बहल्ले करण्यात आले होते.

कशी असेल नवी पॅलेट गन?
हिसंक जमावावर नियंत्रण मिळवण्याचा सोपा पर्याय म्हणून पॅलेट गनचा उल्लेख केला जातो. पॅलेट गनशिवाय अश्रूधूर, वॉटरकॅनन, पेपरस्प्रे, टीजे गॅसचाही जमावाला नियंत्रीत करण्यासाठी वापर केला जातो. शिकार आणि पेस्टकंट्रोल करण्यासाठीही पॅलेटगनचा वापर केला जातो. एखाद्या व्यक्तीला घायळ करून जखमी करण्यासाठी पॅलेट गन वापरली जाते. या पॅलेट गनचा प्रभाव 500 यार्डापर्यंत असतो. पण जवळून या गनचा वापर केल्यास तर ही गन धोकादायक ठरते. या गनमधून निघालेली गोळी डोळ्याला लागल्यास दृष्टी जाण्याचा धोका असतो. पहिल्या स्वरुपातील पॅलेट गनच्या वापरामुळे साधरणपणे 40 टक्के चुका होत असत. पण, आता या बंदुकींच्या टोकावर डिफ्लेक्टर्स लावल्यामुळे या चुकांचे प्रमाण दोन टक्क्यांवर येईल. याआधीच्या पॅलेट गनने कमरेच्या खाली नेमधरुन मारा केल्यावरही तो नेम चुकायचा आणि त्यामुळे शरीराच्या नाजूक भागांना इजा व्हायची. आता डिफ्लेकेटर्समुळे शरीराच्या वरच्या भागाला इजा होण्याचे प्रमाण कमी होईल. पॅलेट गनच्या एका कार्टिरेजमध्ये बॉलबेअरिंगप्रमाणे दिसणार्‍या 100 गोळ्या असतात. ट्रिगर दाबताच या गनमधून 100 मीटर लांब अंतरापर्यंत 100 पॅलटे्सचा वर्षाव होतो.

पावाशेल्फमध्ये बदल करणार
काश्मिरमधील निमलष्करी दलांना कमीत कमी नुकसान करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या वापरात असलेल्या पावा शेल्फ म्हणजेच मिरचीच्या पूडपासून बनवलेल्या हातबॉम्बमध्ये काही बदल करून ते आणखी प्रभावशाली बनवण्याच्या सूचना केंद्रीय राखीव सुरक्षा दलांनी सीमा सुरक्षा दलाला केली आहे. सध्याचे पावाशेल्फ हे सुरक्षादलांसाठी बुमरँग ठरत आहे. हे पावाशेल्फ जमावावर फेकल्यावर त्यातून मिरचीचा धूर निघायच्या आधीच ते परत जवानांवर फेकले जातात. त्यामुळे या पावाशेल्फचे आवरण जमिनीवर फेकल्यावर लगेच त्यातून धूर निघेल अशा पद्धतीने बनवावे, असे सीमा सुरक्षा दलाला सांगण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात पावाशेल्फही काश्मिरमध्ये प्रभावी ठरतील.