काळ्या हळदीच्या आमिषाने मुंबईसह पुण्यातील चौघांना पावणेदोन लाखांचा गंडा

0

मुक्ताईनगर : काळ्या हळदीने कुलूप उघडत असल्याचा व्हिडिओ यु ट्यूबवर टाकून मुंबईसह पुण्यातील चौघांचा विश्‍वास संपादन करीत त्यांना वढोद्यात बोलावून दगड, काठ्यांनी मारहाण करीत मोबाईल, चांदीचे कडे व एक लाख 67 हजार रुपयांची रोकड लांबवण्यात आल्याची घटना 8 ऑगस्ट रोजी वढोदा शिवारातील श्री मच्छिंद्रनाथ मंदिर परीसरातील जंगलात घडली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या संशयीतांविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी किसन कस्तुलापुरी यांच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी मनेल चव्हाण, क्रीश पवार, रणजीत चव्हाण, रामचंद्र पवार, नाना आवीळ (सर्व रा.हलखेडा) व अतुल भालेराव (रा. खोपोली) यांच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळी हळद कुलूपाला लावल्यास कुलूप उघडत असल्याची माहिती संशयीतांनी यू-ट्यूब चॅनलवर टाकली होती. हा व्हिडीओ बघून अतुल शंकर भालेराव (रा.खोपोली, रायगड) याने मनेल पांडुरंग चव्हाण (रा.हलखेडा, ता.मुक्ताईनगर) यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. भालेराव याने त्याचे मित्र किसन राजन्ना कस्तुलापुरी (रा.मुंबई, वाशी), निखील गुलाबराव जाधव (रा.पुणे) व संतोष लोहार (रा.पुणे) यांना माहिती दिली होती व त्यानुसार काळी हळद घेण्यासाठी संशयीतांनी त्यांना कुर्‍हा-हलखेडा परीसरात बोलावले होते.

जंगलात नेवून मारहाण करीत लुटले
ठरल्यानुसार, किसन, निखील, अतुल व संतोष लोहार हे चारचाकीने शेगावमार्गे नांदुरा, जळगाव जामोद हद्दीत आले. याठिकाणी संशयित मनेल चव्हाण याने त्यांना जळगावजामोद जवळील सुपोपळशी गावाजवळ त्यांना थांबायला सांगितले. त्या ठिकाणी मनेल चव्हाण याच्यासह संशयीत क्रीश पवार, रणजीत चव्हाण, रामचंद्र पवार, नाना आवीळ (सर्व रा.हलखेडा) यांनी दुचाकीवर जात त्या चौंघांना दुचाकीवर बसवून वढोदा येथील जंगलात नत दगड, काठ्यांनी मारहाण करत मोबाईल, चांदीचे कडे व एक लाख 67 हजारांची रक्कम लुटली तसेच चारचाकीची चावी हिसकावून पोबारा केला.

Copy