काळे फसण्याची भाषा करणारे शेतकर्‍यांच्या नजरेत काळे

0

अमळनेर । भाजपा जिल्हाध्यक्षांना काळे फसण्याची भाषा करणारे जिल्हा बँकेचे संचालक अनिल पाटील हे कर्ज देण्यास आणि अमळनेरतील शाखा तोट्यात जाण्यापासून वाचवण्यात अपयशी ठरल्याने त्यांचेच तोंड शेतकर्‍यांच्या नजरेत काळे झाले आहे, असा आरोप भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राकेश पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहेत. त्यात जिल्ह्यांतील 50 शाखा तोट्यात असल्याने नाबार्डने बंद करण्याचे आदेश दिले आहेत, असे कारण दाखवून शेतकर्‍यांना कर्ज कमी देण्याबाबत आणि येणार्‍या अडचणी बाबत सांगून स्वतःचे अपयश लपविण्याचा प्रयत्न केला.

शेतकर्‍यांच्या फसवणुकीचाही आरोप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुणबी नाहीत असे म्हणणारे अनिल पाटील आतापर्यंत त्याच पक्षात त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते हे विसरले काय? शेतकर्‍यांनी तुम्हाला विश्वासाने निवडून दिले आहे. मग जिल्हा बँकेच्या शाखा वाचविण्याचा प्रयत्न का केला नाही. जिल्हा बँकेतील ठेवी वाढवण्याचा प्रयत्न का केला नाही? शाखा तोट्यात असतांना नोकर भरतीसाठी प्रयत्न का सुरु आहेत? ठामपणे आम्ही नोकर भरती करणारच नाहीत असे का जाहीर करत नाहीत. जिल्हा बँक शेतकर्‍याची आहे ती राजकारणाची किंवा ठेकेदारांची नाही खरे बोलण्याची एवढी मिरची लागत असेल तर शेतकर्‍यांना खोटे बोलून वेठीस धरू नका, कर्ज देता येत नसेल तर जिल्हा बँक संचालक पदाचा राजीनामा द्यावा व शेतकर्‍याची पिळवणूक थांबवावी, आपले जनतेसमोर काळे झालेले तोंड स्वच्छ करा, मग दुसर्‍यांना काळे लावण्याची भाषा करावी, असे त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.