कार चालकाला लुटले

0

हिंजवडी : पुणे-मुंबई दरम्यान प्रवासी वाहतूक करणार्‍या कार चालकाला पनवेलजवळ बंदुकीचा धाक दाखवून लुटल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी अनोळखी इसमांविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नजीर शेख (वय 40, रा. नवी मुंबई) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नजीर शेख यांचा पुणे-मुंबई प्रवासी वाहतूक करण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे असलेल्या कारमधून (एमएच 06 एएफ 2350) ते प्रवासी वाहतूक करतात. शेख हे रविवारी (दि. 2) रात्री साडेदहाच्या सुमारास हिंजवडीत प्रवासी घेऊन आले होते. त्यावेळी तीन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले. त्यांनी खारघर येथे जायचे असल्याचे सांगून गाडीत बसले. या तिघांनी तळेगाव टोलनाका ओलांडल्यानंतर शेख यांना चाकुचा आणि बंदुकीचा धाक दाखवून पनवलेजवळ एक्झिटजवळ गाडी थांबवली. शेख यांना गाडीच्या खाली उतरवून गाडी आणि मोबाईल, असा एकूण एक लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेला. या घटनेची सुरुवात हिंजवडी येथून झाल्याने झिरो नंबरने हा गुन्हा हिंजवडी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.