कार्ला गड भाविकांनी गजबजला

0

लोणावळा : वेहेरगाव येथील कार्ला एकवीरा देवीच्या यात्रेस प्रारंभ झाल्याने संपूर्ण गड भाविकांच्या उपस्थितीने गजबजून गेला आहे. शालेय परीक्षा सुरु असल्याने नेहमी प्रमाणे यावेळी भावकांची संख्या प्रमाणापेक्षा थोडी कमी जाणवत आहे. मात्र तरीही देवीचे माहेरघर असलेल्या देवघर येथील श्री भैरवनाथ देवाच्या पालखी सोहळ्याने सुरुवात झालेली ही यात्रा पुढील दोन दिवस सुरु राहणार असून या कालावधीमध्ये लाखो भाविक देवीच्या दर्शनाला येतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

अहोरात्र दर्शन व्यवस्था
महाराष्ट्राचे आराध्य दैवत व कोळी, आग्री, कुणबी, सोनार आदी समाजाची कुलस्वामीनी असणार्‍या आई एकवीरा देवीच्या यात्रा काळात राज्याच्या विविध भागातून लाखो भाविक दर्शनाला येतात. या काळात दर्शन सुलभतेने व्हावे यासाठी मंदिर सलग 48 तास खुल असते. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष काळजी घेतली जाते. उपाध्यक्ष मदन भोई, सचिव संजय गोविलकर, खजिनदार नवनाथ देशमुख, विश्वस्त विलास कुटे, काळूराम देशमुख, विजय देशमुख, पार्वताबाई पडवळ, सरपंच नीलिमा येवले, व्यवस्थापक म्हात्रे हे सर्व नियोजनात व्यस्त असतात.

ट्रस्ट व सर्व यंत्रणा सज्ज
आज (दि. 03) रोजी गडावर देवीची मुख्य पालखी मिरवणूक व उद्या पहाटे देवीचा तेलवणाचा व मानाचा कार्यक्रम अशी या यात्रेची रूपरेषा आहे. वेहेरगाव तसेच कार्ला परिसरात बंदोबस्ताकरिता पोलिस प्रशासनाच्या वतीने 25 अधिकारी व 320 कर्मचारी तैनात आहेत. वाहतूक कोंडी व वाहनतळाचा प्रश्न सोडविण्यासाठी जागोजागी वाहनतळाची व्यवस्था केली आहे. तीन दिवस पूर्णतः दारूबंदी असल्याने कार्ला फाटा, हॉटेल ट्रेजर या दोन एन्ट्री पॉईंट वरील चेक पोस्ट वर सर्व वाहनांची तपासणी होत आहे. एसटी महामंडळाकडून कोकण भागातील भाविकांसाठी 150 बसेसची सोय केली आहे. जिल्हा परिषद व महावितरणकडून अहोरात्र पाणी व वीज उपलब्ध असेल. पाण्याचे टँकर, अग्निशमन व्यवस्था, रुग्णवाहिका, फिरते शौचालय आदी यंत्रणाही यात्रेच्या ठिकाणी तैनात असतील. गडावर फाटाके तसेच वाद्य वाजविणे, दारू घेऊन जाणे, पशुहत्या करणे यांना पूर्णतः बंदी आहे. देवस्थानसह सर्वच यंत्रणांनी कंबर कसली आहे.

पालखीला मोठा बंदोबस्त
मागील वर्षी देवीच्या पालखी सोहळ्यात मानावरून ठाणे आणि पेन या दोन गटातील भाविकांमध्ये धुमश्‍चक्री झाली होती. यंदा तसा प्रकार घडू नये यासाठी चौल आग्रव, पेन आणि ठाणे येथील भाविकांमध्ये जिल्हाधिकार्‍यांनी समेट घडवून आणला आहे. मात्र, तरीही ठाणेकर भाविक नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे, तशी तक्रारही अध्यक्ष तरे यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर यंदा पालखी सोहळ्यात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याकरिता मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आलेे.