कार्यकारी अभियंत्याच्या टेबलावर ठेवले तेलाचे दिवे

0

भुसावळात भारनियमनाविरुद्ध सेनेचे अनोखे आंदोलन

भुसावळ- ऐन नवरात्रीत महावितरणने सुरू केलेल्या भारनियमनाविरुद्ध जनसामान्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर असताना बुधवारी शिवसेनेने महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता रमण दातूनवाला यांच्या दालनातील टेबलवर तेलाचे दिवे पेटवून अनोख्या पद्धतीने भारनियमनाचा निषेध केला. भारनियमन बंद न झाल्यास वीज बिलांचा भरणा थांबवण्याची मोहीम हाती घेऊ, असा ईशाराही देण्यात आला. महावितरण कंपनीने नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी या सणासुदीच्या तोंडावर विभागातील 47 फीडरवर तब्बल साडेआठ तास भारनियमन सुरू केले आहे. या निर्णयाविरुद्ध सर्वत्र नाराजीचे सूर उमटत आहेत. वेगवेगळ्या पक्ष-संघटनांनी वीज वितरणकडे निवेदन देऊन भारनियमन रद्द करावे, अशी आग्रही मागणी केली आहे.

अधिकार्‍यांच्या टेबलावर ठेवले पेटते दिवे
बुधवारी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांची भेट घेत भारनियमन रद्द करावे, हा आग्रह धरला. एवढ्यावरच न थांबता शिवसैनिकांनी कार्यकारी अभियंत्यांच्या दालनातील टेबलवर वापरलेल्या ऑइलचे दिवे पेटवले. रात्रीच्या वेळेस पूर्ण दाबाने वीजपुरवठा करावा, उत्सव काळात आणि शेतीला गरज असताना होणारे भारनियमन तत्काळ बंद करावे. अन्यथा शिवसेना नागरिकांनी विजबिल भरु नये, अशी मोहीम हाती घेईल. भारनियमन पूर्णपणे बंद झाल्याशिवाय वीजबिलाचा भरणा करु देणार नाही, असा इशारा शिवसैनिकांना दिला. आंदोलकांच्या या भूमिकेला वीज वितरण अधिकारी-कर्मचारी समाधानकारक उत्तर देवू शकले नाहीत.

आंदोलनात यांचा होता सहभाग
आंदोलनात तालुकाप्रमुख समाधान महाजन, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, उपतालुका प्रमुख हिरामण पाटील, शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे, शहरप्रमुख नीलेश महाजन, महिला आघाडी जिल्हा संघटिका पूनम बर्‍हाटे, महिला आघाडी शहर संघटिका भुराबाई चव्हाण, शहर संघटक योगेश बागुल, उपशहर प्रमुख अन्सार शाह, उपशहर प्रमुख धनराज ठाकूर, उपशहर संघटक नबी पटेल उपस्थित होते.

Copy