कार्यकर्ते थांबविण्यासाठी सरकार येत असल्याचा भाजपाकडून कांगावा

0

माजी मंत्री एकनाथराव खडसेंची राष्ट्रवादीच्या जिल्हा बैठकीत टिका

जळगाव: राज्याचे राजकारण आता बदलत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी पाय रोवत आहे. यापुढे ती अधिक मजबूत होईल. विरोधकांना कितीही वाटत असेल की हे सरकार पडेल, पण तसे काहीही होणार नाही. हे सरकार टिकणार आहे, व्यवस्थितपणे चालणार आहे, असा विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी, आपल्या महाविकास आघाडी सरकारचे 5 वर्षे असेच निघून जातील. यांना ’पुन्हा येईल, पुन्हा येईल’ करतच रहावे लागेल. दरम्यान अनेक लोक भाजपा सोडत आहेत. कार्यकर्त्यांना थांबविण्यासाठी आपले सरकार येईल असा कांगावा भाजपाकडुन केला जात असल्याची टिका माजी मंत्री खडसे यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे 11 फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍याच्या पूर्वतयारी बाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची जिल्हा बैठक बुधवारी दुपारी पक्ष कार्यालयात पार पडली. या बैठकीत मार्गदर्शन करताना एकनाथ खडसे बोलत होते. खडसेंनी यावेळी मार्गदर्शन करताना पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दौरा यशस्वी करण्याचे आवाहन करताना विरोधकांना चिमटे काढले. खडसे पुढे म्हणाले, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दौरा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आपल्या जिल्ह्यात अधिक यशस्वी झाला पाहिजे. अहंमपणामुळे भाजपची राज्यातून सत्ता गेली हे सर्वांना माहिती आहे, असा टोला खडसेंनी फडणवीस यांना लगावला.

जे गावात निवडून येत नाही ते टिका करतात
कोण चांगले काम करत आहे, कोण वाईट काम करत आहे, याकडे जनतेचे लक्ष आहे. म्हणून कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाचा विस्तार कसा वाढेल, या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. कोण काय म्हणतो, याकडे दुर्लक्ष करा. टीका टिप्पणी होतच राहणार आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. जे आमच्यावर टीका करतात ते गावातच असतात. ज्यांची गावात निवडून येण्याची क्षमता नाही, ते नाथाभाऊचे नाव घेतात असे सांगत खडसेंनी त्यांच्यावर टीका करणार्‍यांचा समाचार घेतला.

वर्तमानपत्राकडे दुर्लक्ष करा
वर्तमानपत्रात कधी काही आले तर पॅनिक होऊ नका. वर्तमानपत्रात कधी चांगले तर कधी वाईट येते. वर्तमानपत्रात कधी काय येते, याचा मला गेल्या 40 वर्षांत चांगला अनुभव आहे. आपलं काम सोडू नका. आपल्याला एकजुटीने काम करायचे आहे. प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या दौर्‍याच्या निमीत्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन करा असे आवाहनही खडसे यांनी केले.

यांची होती उपस्थिती
या बैठकीला जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, माजीमंत्री गुलाबराव देवकर, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार मनीष जैन, अरुण पाटील, दिलीप वाघ, महिला प्रदेश उपाध्यक्षा मंगला पाटील, वंदना चौधरी, डॉ. ऐश्‍वर्या राठोड, जिल्हा बँकेचे माजी संचालक वाल्मिक पाटील, धरणगावचे ज्ञानेश्‍वर महाजन, जिल्हा समन्वयक विकास पवार, प्रवक्ते योगेश देसले, विलास पाटील, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, युवती जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, सामाजिक न्याय विभागाचे अरविंद मानकरी, युवकचे माजी जिल्हाध्यक्ष ललित बागुल, भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, वाय.एस. महाजन, सलीम इनामदार यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Copy