कारमध्ये अश्लिल चाळे करणाऱ्या प्रेमियुगलाला चोपले

0

निर्भया पथकाची कारवाई : नागरिकाने केली होती फोनवरून तक्रार

जळगाव: शहरातील कोल्हे हॉस्पिटलमागे असलेल्या जैन मंदीर परिसर म्हणजे जणू प्रेमीयुगलांचा कट्टा बनला आहे. या ठिकाणी रस्त्यावर तरूण तरूणी बिनधास्तपणे अश्लिल चाळे करतांना आढळून येतात. अशाच प्रकारे शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास या पसिरात उभ्या एका महागड्या कारमध्ये तरुण-तरुणी अश्लिल चाळे करत असल्याची तक्रार नागरिकांनी पोलिसात केली. त्यावरुन निर्भया पथकाने घटनास्थळ गाठून संबंधित कारमधील प्रेमीयुगलाला चांगलाच चोप दिला. या घटनेनंतर कार तसेच प्रेमीयुगलाला घेवून पथकाने रामानंदनगर पोलीस ठाण्यात जमा केले होते.

कोल्हे हॉस्पिटलच्यामागे जैन मंदीर परिसरातील गल्ल्यांमध्ये तरूण तरूणी रस्त्यावर दुचाकी लावून चाळे करत असून असभ्य वर्तन करत आहेत. तसेच एका कारमध्ये एक तरूण एक तरूणी चाळे करत असल्याची तक्रार दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास जिल्हापेठ तसेच पोलीस कंट्रोलरूमला सुज्ञ नागरिकांनी फोन वरुन केली. नियंत्रण कक्षाने प्रकाराबाबत निर्भया पथकाला माहिती दिली. पथकातील पोलीस नाईक मंजुळा तिवारी यांच्यासह रामानंदगरचे पोलीस कॉन्सटेबल हरिशकुमार डोईफोडे , होमगार्ड भालसिंग बारेला यांनी घटनास्थळ गाठले. पोलीस येत असल्याची चाहूल लागताच गल्लीबोळात घोळ करून उभे असलेल्या तरूण तरूणींनी ताब्यातील वाहने घेऊन पळ काढला.

पथकाशी प्रेमीयुगुलाची अरेरावी

तक्रारीनुसार पथकाला याठिकाणी एम.एच. 19 ए.ई. 5400 या क्रमाकांची कार उभी दिसली. कारचा दरवाजा बंद तर आतमध्ये तरुण व तरुणी दोघे एकटेच होते. पथकाच्या मजुंळा तिवारी यांनी कारचा दरवाजा उघडण्याचे सांगीतल्यानंतर तरूणाने दरवाजा उघडला. कर्मचार्‍यांनी तरुणाला काय प्रकार आहे, असे विचारताच त्याने पथकाशी अरेरावी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिवारी यांनी या प्रेमीयुगलास चांगलाच चोप दिला. तिवारी यांनी चालक भिकन सोनार यांच्यासह कार व तरुण-तरुणी या दोघांना ताब्यात घेवून रामानंदनगर पोलीस ठाण्यात आणले. पोलिसात उशीरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरु होते.