Private Advt

कामगाराच्या मृत्यूनंतर दीपनगरात आंदोलन

अचानक झालेल्या दगडफेकीने पळापळ : आंदोलकांना पांगवताना पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज ; 10 ते 15 आंदोलक जखमी

भुसावळ : दीपनगर नवीन प्रकल्पातील कंत्राटी कामगाराचा मंगळवारी रात्री मृत्यू झाल्यानंतर लागलीच मृतदेह कुटुंबियांचा हवाली करून बिहारमध्ये रवाना करण्यात आला मात्र संबंधित कामगाराच्या वारस कुटुबियांना नियमानुसार मदत करावी, कंत्राटी कामगारांचा वेतन प्रश्न निकाली निघावा व नियमित पगार करावेत आदी मागण्यांसाठी भीम आर्मी एकतातर्फे बुधवारी सकाळी आंदोलन करण्यात आले. महाजनकोच्या अधिकार्‍यांना भेटण्यासाठी आंदोलक जात असतानाच अचानक दगडफेक झाली व त्याचवेळी पोलिसांनी केलेल्या लाठीमारात सुमारे 15 ते 20 आंदोलक जखमी झाल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकारानंतर कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान, कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर अधिकार्‍यांमध्ये माहितीचा समन्वय दिसून आल्याने आश्चर्य व संताप व्यक्त करण्यात आला.

उपचारासाठी पैसे न मिळाल्याचा आरोप
दीपनगरातील 660 प्रकल्पात सब ठेकेदार असलेल्या इनवेल कंपनीतील कंत्राटी कामगार शैलेंद्र यादव (34, रा.सांगवी, बिहार, ह.मु.लेबर कॉलनी, दीपनगर) हा आजारी असल्याने त्याला पैश्यांची गरज होती मात्र त्याला गेल्या तीन महिन्यापासून वेतन मिळाले नसल्याने उपचारासाठी पैसा न मिळाल्याने यादव याचा मृत्यू झाल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला. दरम्यान, दीपनगर नवीन प्रकल्पातील सुमारे दोन हजार कंत्राटी कर्मचार्‍यांना गेल्या तीन महिन्यापासून वेतन मिळालेले नसल्याने भीम आर्मीतर्फे गेल्या चार दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. त्यातच शैलेंद्र यादव हा कंत्राटी आजारी पडल्यानंतरही त्यास वेतन न देता आश्वासन देण्यात आले मात्र पगाराअभावी उपचार करण्यास विलंब झाला. त्यांना मंगळवारी रात्री वरणगाव येथे उपचारासाठी खाजगी दवाखान्यात नेले असता त्यांचा मृत्यू झाला. भेल कंपनीचे अधिकारी संजय गोसावी यांनी आमच्याकडून नियमीत पगार दिले जातात, असे सांगून सब ठेकेदाराने पगार का दिले नाही? याची माहिती घेतली जाईल, असे सांगितले. कामगाराच्या मृत्यूनंतरही संबंधिताना या घटनेची माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

मृतदेह परत आणण्यासाठी आंदोलक संतप्त
शैलेंद्र यादव या कामगाराचा मंगळवारी रात्री मृत्यू झाल्यानंतर त्याची माहिती बुधवारी सकाळी आंदोलकांना कळताच ते संतप्त झाले. परस्पर मृतदेह हलवल्याप्रकरणी त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसेच मृत कामगाराचा मृतदेह पुन्हा आंदोलनस्थळी आणण्याची मागणी केली. आंदोलक 660 प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत जात थेट ऑफिसपर्यत जाऊन पोचले. तेथे अधिकार्‍यांनी चर्चेस यावे आंदोलकांचे म्हणणे होते, याच वेळी दगडफेक झाली. यामुळे दीपनगर प्रकल्प 660 प्रकल्पाच्या कार्यालयाच्या परीसरात एकच धावपळ झाली. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे तेथे असलेल्या सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी आंदोलकांवर थेट लाठीमार करून आंदोलकांना पांगविले.

पोलिस अधिकार्‍यांची धाव
दीपनगरातील मुख्य प्रवेशद्वारासह परीसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला असून आरसीपी प्लॉटूनचे जवान, तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, तालुका पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी घटनास्थळी धाव घेतली.

दीपनगरात अनेक गैरप्रकार : गणेश सपकाळे
दीपनगर प्रकल्पात काम करणारे एक हजार 800 कामगार हे गेल्या तीन महिन्यापासून वेतनाच्या प्रतीक्षेत आहे. दीपनगर प्रशासनाकडे वेतनाची मागणी केली मात्र त्यांनी भेलकडे बोट दाखविले. कामगार जर काम करीत आहे तर त्यांना वेतन देणे आवश्यक आहे, मात्र तसे होत नाही. येथे मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असल्याचा आरोप भीम आर्मीचे गणेश सपकाळे यांनी केला. पोलिसांनी केलेल्या लाठीमारमध्ये अनेक कामगार जखमी झाल्याचे ते म्हणाले.