कापड व्यापार्‍याची 50 हजार लांबवले : सुरतचे तिघे आरोपी जाळ्यात

जळगाव सोडण्याच्या निमित्ताने व्यापार्‍याच्या खिशातील 50 हजारांची लांबवली होती रोकड : क्राईम ब्राँचच्या मदतीने अटक

भुसावळ : भुसावळहून जळगावकडे निघालेल्या कापड व्यापार्‍याकडील 50 हजारांची रक्कम लांबवून तिघा संशयीतांनी पोबारा केल्याची घटना 6 मार्च रोजी नाहाटा महाविद्यालयाजवळ घडली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर सुरत क्राईम ब्रँचच्या मदतीने सुरतमधील तिघा भामट्यांच्या मुसक्या आवळण्यात यंत्रणेला यश आले आहे. आरोपींना शुक्रवारी अटक करण्यात आल्यानंतर तपास पथक भुसावळकडे रवाना झाले आहे. युनूस उर्फ अमीन युसूफ शेख, महेश मधुकर सपकाळे, संम्स तबरेज मेहताब अन्सारी (सर्व रा.सुरत) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली पाच लाख रुपये किंमतीची इर्टीगा व 14 हजारांची रोकड जप्त करण्यात आली.

लिप्टच्या बहाण्याने व्यापार्‍याला लुटले
व्यापारी सुनील उधमदास माखीजा (सिंधी कॉलनी, भुसावळ) यांचे जळगावातील बळीराम पेठेत जय माता दी रेडिमेड नावाचे दुकान असून ते 6 मार्च 2021 रोजी दुपारी 12.45 वाजता दुकानावर जाण्यासाठी 50 हजारांची रोकड घेवून निघाले. नाहाटा चौफुलीवर आल्यानंतर त्यांना पांढर्‍या रंगाच्या इर्टीका कारच्या चालकाने कुठे जावयाचे असे विचारल्यानंतर माखीजा यांनी जळगाव जावयाचे सांगितल्यानंतर चालकाने जे भाडे असेल ते द्या व आम्ही नागपूर येथून नाशिक येथे जात असल्याचे सांगितल्याने व्यापारी वाहनात बसले मात्र ओव्हरब्रीज पास केल्यानंतर सुभाष गॅरेजजवळ गाडी थांबवून वाहनात दाटी होत असल्याचे सांगून व्यापार्‍याला खाली उतरवून देण्यात आले. त्याचवेळी जीन्स पँटमधील रोकड तपासली असता ती गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यापार्‍याने पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.

सुरतमधून आवळल्या आरोपींच्या मुसक्या
बाजारपेठ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर कारच्या क्रमांकावरून आरोपींपर्यंतचा माग काढला व सुरत क्राईम ब्रँचच्या मदतीने शुक्रवारी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे व सहा.पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जयराम खोडपे, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी तसेच सुरत क्राईम ब्रांचचे सहाय्यक फौजदार संजय पाटील, सहा.फौजदार रवींद्र माळी यांच्या सहकार्याने आरोपींना अटक करण्यात आली.