काका- पुतण्याची एकाचवेळी अंत्ययात्रा

0

महामार्गावर पहिल्यांदाच दुचाकी चालविणे जीवावर बेतले

जळगाव : बांभोरी येथील बहिणीच्या सासरे सिताराम नन्नवरे यांचे शुक्रवारी सकाळी अल्पशः आजाराने निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी जात असलेल्या महेश पोपट तायडे (32) व त्यांचा पुतण्या जयवंत उर्फ सोनू रतीलाल तायडे (16) दोन्ही रा. रवंजा (खडकी) ता.एरंडोलअ या दोघांवर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्याची दुर्देवी वेळ नातेवाईकांवर आली. या घटनेने रवंजे संपूर्ण गाव सुन्न झाले होते. महेश तायडे हे 20 वर्षापासून जळगावातील कापड दुकानावर बसने ये-जा करत होते, दुचाकी व्यवस्थित चालविता येत नसल्याने दुचाकी घेण्याची परिस्थिती असतांनाही, आपआपली बस बरी म्हणत ते रोजच प्रवास करायचे. नेमक शुक्रवारी बहिणीच्या सासर्‍याच्या अंत्ययात्रेसाठी जाण्यासाठी दुचाकी घेतली. जशी येत होती तशी दुचाकी चालवित जैन पाईप कंपनीपर्यंतही पोहचले. अवघ्या 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर बांभोरी असतांना काळाने महेश तायडे यांच्यासह त्यांचा पुतण्या जयवंतवर काळाने झडप घातली. त्यामुळे अरुंद तसेच खड्डेमय महामार्ग आणखी किती जणांचे बळी घेणार, हा प्रश्न उपस्थित होत असून प्रशासनावर रोष व्यक्त होत आहे.

काकानंतर तासाभराने पुतण्याचाही झाला मृत्यू

रवंज येथील भानुदास पाटील हे महेश तायडे यांच्या समोर दुचाकीने चालत होते. यादरम्यान थोड्याच वेळाने अपघात झाल्याचे कळताच भानुदास पाटील यान दुचाकी फिरवून घटनास्थळ गाठले. त्यांना मयत दोघे रवंजे येथील असल्याने पाटील यानीं तत्काळ फोनवरुन प्रकार गावात कळविला. तोपर्यंत बांभोरी येथे अंत्ययांत्रेसाठी जमलेल्या नातेवाईकांनीही या अपघाताची माहिती मिळाली. अनेकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतला. तोपर्यंत जैन कंपनीच्या कंपनीच्या रुग्णवाहिकेतून दोघांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. याठिकाणी डॉ. प्रविण पाटील यांनी दोघांवर तातडीने उपचार सुरु केले. मात्र गंभीर दुखापत झालेल्या दोघांकडून उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही. 9.10 मिनिटांनी महेश तायडे यांची प्राणज्योत मालवली तर बरोबर तासाभराने म्हणजेच 10.10 वाजून मिनिटांनी पुतण्या जयवंतनेही जगाचा निरोप घेतला व त्याचाही मृत्यू झाला. डॉ. प्रविण पाटील यांच्या खबरीवरुन जिल्हापेठ पोलिसात शून्य क्रमांकाने नोंद करण्यात आली आहे.

महामार्गावर पहिल्यांदाच दुचाकी चालविणे जीवावर बेतले

महेश तायडे हे शहरातील गांधी मार्केटमध्ये नरेंद्र गमवाल यांच्या कापडाच्या दुकानात कामाला होते. गेल्या आठ ते दहा वर्षापासून ते रवंजा येथुन एस.टी.बसने दररोज ये जा करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. महेश यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एकु मुलगी ,आई, दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवा आहे. दुचाकी घेण्याची परिस्थिती असतांना महामार्गावरील वाढते अपघात, तसेच दुचाकी व्यवस्थित चालविता येत नसल्याने दुचाकी घेत नव्हते. त्यामुळे बसनेच प्रवास करायचे आहे. योगायोगाने शुक्रवारी महेश तायडे यांच्या भावाची दुचाकी घरीच होती. बांभोरी काही अंतरावर असल्याने दुचाकीवरुन जावू अन् परत येवू असा विचार करुन तायडे यांनी दुचाकी घेतली. महामार्ग असल्याने पुतण्याला दुचाकी चालविण्याचे सांगण्यास भिती वाटली. पहिल्यांदाच दुचाकी महामार्गावर चालवित तायडे बांभोरीकडे निघाले. अन् काही अंतरावरच काळाने त्यांच्यासह पुतण्यावर काळाच्या रुपाने अपघाताने झडप घातली. व दोघांचा जीव घेतला.

मुलाच्या मृत्यूचे कळताच आईची विहिरीकडे आत्महत्येसाठी धाव

जयवंत उर्फ सोनू हा दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याचे वडील रतीलाल पोपट तायडे हे सत्तार बागवान यांच्या आयशर ट्रकवर चालक म्हणून कार्यरत आहे. ट्रक चालवून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. केळी भरल्यानंतर गुरूवारी सायंकाळी रतीलाल तायडे हे ट्रक घेऊन मुंबईकडे रवाना झाले. वडील नसल्याने त्यांच्या ऐवजी मुलगा जयवंत याला याला घेवून महेश तायडे हे बांभोरीकडे निघाले. जयवंतचा जागीच मृत्यूची झाल्याची वार्ता कानी पडताच जयवंतची आईला मोठा धक्का बसला. त्यांनी घरापासून काही अंतरावर असलेल्या ग्रामपंचायतीच्या विहिरीकडे धाव घेतली पण घरातील इतर कुटुंबियांच्या वेळीच प्रकार लक्षात आल्याने त्यांनी त्यांना रोखून धरले. प्रचंड आक्रोश करत जयवंतची आई कुटुंबातील सदस्यांना मिठी मारत होती. मन हेलावणारा असा प्रसंग बघून गावातील इतरांचेही डोळे पाणावले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी दिली.

म्हसावदलाच एक्स्प्रेस थांबविण्यासाठी नातेवाईकांकडून विनंती

मुंबईला पोहचलेल्या रतीलाल तायडे यांना लहान भाऊ महेश तायडे याच्यासह मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याचे नातेवाईकांकडून समजले. रतीलाल तत्काळ हे मुंबई येथून मिळेल त्या एक्स्प्रेसने रवंजेकडे पोहचण्यासाठी निघाले. गाडीत बसल्यावर ती गाडी भुसावळलाच थांबते, असे कळाल्यावर रतीलाल यांनी त्याच्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. नातेवाईकांनी तत्काळ जळगाव रेल्वे स्टेशन गाठून येथील भावाचा, मुलाच्या अंत्यदर्शनासाठी वेळेवर पोहचावे म्हणून रेल्वेच्या अधिकार्‍यांना काही सेंकदासाठी म्हसावदला थांबवावी अशी विनंती केली.

वेळेपूर्वी बांभोरीला करावे लागले अंत्यसंस्कार

बांभोरी येथे सिताराम नन्नवरे यांच्या अंत्यसंस्काराची दुपारी 1 वाजेची वेळ नातेवाईकांना कळविण्यात आली. यासाठी नातेवाईक बांभोरीला जमलेही होते. मात्र त्यापूर्वीच अंत्ययात्रेलाच येणार्‍या महेश तायडे व पुतण्या जयवंत तायडे यांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे नन्नवरे यांच्यावर 11 वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. येथील अंत्यसंस्कार आटोपून नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात तसेच रवंजेकडे धाव घेतली.

हृदय पीळवून टाकणारा आक्रोश

आधीच सासर्‍यांच्या निधन झाल्याच्या दुःखात आक्रोश करणार्‍या बहिणीला अंत्ययात्रेसाठी येणार्‍या भावाचा तसेच भाच्याचा मृत्यूची बातमी मिळाली. त्यामुळे तिचा प्रत्येकाचे हृदय पिळवून टाकणारा असा आक्रोश होता. शवविच्छेदनानंतर दोघांचा मृतदेह रवंज येथे हलविण्यात आला. याठिकाणी काका व पुतण्याची एकाचवेळी निघालेल्या अंत्ययात्रेने गावकर्‍यांचे डोळे पाणावले होते. सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास दोघांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.