कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे भारताच्या प्रतिमेस धक्का: शरद पवारांचे आरोप

0

नवी दिल्ली: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत टीका केली आहे. केंद्र सरकारने अचानक घेतलेल्या निर्यातबंदीच्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचा एक खात्रीशीर निर्यातदार देश म्हणून भारताची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाबाबत शरद पवारांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी संपर्क करून चर्चा केली आहे. शरद पवार यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे.

‘केंद्र सरकारने आकस्मिकपणे कांद्याची निर्यातबंदी जाहीर केली. त्याबाबत महाराष्ट्रातील कांदा उत्पादक बेल्टमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी माझ्याशी काल रात्री संपर्क करून केंद्र सरकारला या प्रतिक्रियेबाबत अवगत करण्याची विनंती केली होती. वरील विनंतीला अनुसरून मी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली’ असे शरद पवारांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी ‘कांदा निर्यातबंदीचा प्रस्ताव केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयातर्फे बाजारातील कांद्याच्या वाढत्या किमतींच्या आधारावर आला आहे. या संदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्रालय, अर्थ मंत्रालय आणि ग्राहक संरक्षण मंत्रालय या तिन्ही मंत्रालयांशी चर्चा करून आम्ही या निर्यातबंदीचा फेरविचार करू व जर एकमत झाल्यास याबाबतीत पुनर्निर्णय घेऊ’ असे सांगितले असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.

केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी कांद्यावर तडकाफडकी निर्यातबंदी लादली. वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनालयाने यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. संबंधित निर्णयाची तातडीने अंमलबजावणी सुरू झाली. या निर्णयावर शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.बंगळुरू रोझ व कृष्णापुरम या जाती वगळून सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनायाने बंदी घातली आहे. कांदा पावडरला या निर्यातबंदीतून वगळण्यात आले आहे.