काँग्रेस-राष्ट्रवादीत अखेर आघाडी

0

जळगाव । नगरपालिका निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर अखेर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी विनायकराव देशमुख यांनी आज संयुक्तरित्या ही घोषणा केली. प्रदेश पातळीवर दोन्ही पक्षांमध्ये आघाडी होण्याचा निर्णय अद्यापदेखील घेण्यात आलेला नसतांना जळगाव जिल्ह्यात मात्र आघाडी करण्यात आल्याची बाब विशेष मानली जात आहे. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष शेवटी एकत्रीतपणे लढले होते.

यानंतर मात्र विधानसभा आणि अलीकडेच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत दोघांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. अर्थात यामुळे दोघांची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. या पार्श्‍वभूमिवर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आघाडी करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिकपासून भारतीय जनता पक्षाची सत्ता असून काही अपवाद वगळता पंचायत समित्यादेखील भाजप-सेनेच्या ताब्यात आहेत. यातच आता आघाडी करण्यात आल्यामुळे जिल्ह्यात भाजप व शिवसेना युती होणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

हॉटेलात नेत्यांची खलबते
सोमवारी दुपारी शहरातील एका हॉटेलमध्ये दोन्ही काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली असली तरी निर्णय मात्र दोन दिवसांनंतर होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रभारी तथा आमदार दिलीप वळसे-पाटील, काँग्रेसचे प्रभारी विनायकराव देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी दोन्ही पक्षांची जिल्ह्यातील स्थिती, जागा वाटप, उमेदवारी, यश संपादन करण्याच्या कृप्त्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडीसाठी अनुकूल वातावरण असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यकर्त्यांशी चर्चा झाल्यानंतर वरिष्ठांकडे आघाडीचा प्रस्ताव पाठविला जाईल असे श्री. वळसे-पाटील व श्री. देशमुख यांनी सांगितले. जिल्हा परीषद ताब्यात घेण्यासाठी आगामी होणार्‍या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीबाबात अनुकूल चर्चा सुरु असून याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसात घेण्यात येईल अशी माहिती दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. भाजपला शह देण्यासाठी आणि काँग्रेसच्या समविचारी पक्षाचे मतविभाजन टाळण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी करावी याबाबत जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत.

बैठकीस यांची उपस्थिती : राष्ट्रवादीचे प्रभारी दिलीप वळसे-पाटील, किरण शिंदे, आमदार डॉ. सतीष पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, रविंद्रभैय्या पाटील, माजी आमदार अरुणदादा पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा समन्वयक विकास पवार तर काँग्रेसचे प्रभारी विनायक देशमुख, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीपभैय्या पाटील, अ‍ॅड.ललिता पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, शहराध्यक्ष अर्जुन भंगाळे, डी.जे.पाटील, प्रदीप पवार, प्रभाकर सोनवणे, अजबराव पाटील.

दोन दिवसात होणार शिक्कामोर्तब
कॉग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी बाबत येत्या दोन दिवसात अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. दोन्ही पक्षांची जिल्ह्यातील स्थिती, इच्छुक उमेदवारांची यादी आणि त्यानंतर जागा वाटप यावर चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादीने रविवारी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या मात्र काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखती अपूर्ण असून त्या पूर्ण झाल्यानंतरच आघाडीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवार, तेथील पक्षाची स्थिती आणि जागा वाटप यांची सांगड घालणे कसे शक्य होईल हे ठरविले जाणार आहे. येत्या दोन दिवसात काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण करणार आहे. त्यानंतर आघाडीचे गाडे पुढे जाणार आहे. दोन्ही काँग्रेसमध्ये आज आघाडीबाबत अनुकूल चर्चा झाली असली तरी अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवरुनच होणार आहे. इच्छुक उमेदवारांच्या यादी तयार झाल्यानंतर मिळणार आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीबाबात दोन्ही पक्षाच्या प्रभारींसमोर चर्चा करण्यात आली असून, येत्या दोन दिवसात आघाडीबाबत अंतिम निर्णय दिला जाणार आहे. यात तालुक्यात किती जागांवर कोणत्या पक्षाने जागा घ्यावी यावर 21 रोजी चर्चा होणार आहे. तासभराच्या झालेल्या चर्चेत अनेक विषयांवर एकमत झाले असून आघाडीचा मार्ग मोकळा होईल.
– डॉ. सतिश पाटील, आमदार (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी)

आगामी होणार्‍या निवडणुकीसाठी आज झालेल्या बैठकीत चर्चा साकारात्मक झाली असून काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखती अपुर्ण आहेत. इच्छुकांच्या मुलाखती पुर्ण झाल्यानंतर राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीचा निर्णय घेता येणार आहे. येत्या दोन दिवसानंतर पुन्हा याबाबत चर्चा होणार असून अंतिम निर्णय घेणार आहोत.
– अ‍ॅड. संदीपभैय्या पाटील (जिल्हाध्यक्ष, काँग्रेस)