काँग्रेस-राष्ट्रवादीतील भ्रष्टाचाराचे आरोप असणार्‍यांना भाजपाने प्रवेश देवून केले पवित्र

0

रावेर (शालिक महाजन) : कुठलीही चोरी वा भ्रष्टाचार केला नसताना पदाचा राजीनामा घेण्यात आला व पक्षातून बाजूला करण्यात आले शिवाय विधानसभेचे तिकीटही नाकारण्यात आले मात्र दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेकांवर आरोप असतानाही त्यांना भाजपात प्रवेश देवून पवित्र करण्यात आले त्यामुळे आपले नेमके चुकले कुठे? व तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आपल्याला क्लीन चीट का दिली नाही? याचा शोध घेणार असल्याची माहिती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली. 2 सप्टेंबर रोजी त्यांचा वाढदिवस असल्याने जनशक्तीने त्यांच्याशी संवाद साधला. ‘कटप्पाने बाहुबली को क्यू मारा? याचे उत्तर नानासाहेब फडणवीसांचं बारभाई कारस्थान’ या पुस्तकातून मिळेल, असेही म्हणाले.

जीवनात घडलेल्या गोष्टी पुस्तकातून मांडणार
नाथाभाऊ म्हणाले की, इतके वर्ष पक्षासाठी काम करणार्‍या माणसाला जाणीव पूर्वक आरोप करून पदावरुन दूर करण्यात आले, आपला मानसिक छळ करण्यात आला शिवाय मला विधासभेचे तिकीट सुध्दा नाकारण्यात आले. असा कोणता गुन्हा मी केला की मला पक्षातून बाजूला करण्यात आले. माझ्यानंतर ज्यांच्यावर आरोप झाले त्यांना तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी (देवेंद्र फडणवीस) क्लीनचिट दिली. माझ्या वाढदिवशी प्रकाशीत होणार्‍या पुस्तकात यावर काहीच गौप्यस्पोट नसून याच्या पुढच्या कालखंडामध्ये एक पुस्तक येत असून यात वेगवेगळी माहिती तसेच टिपण्या जमा करण्याचे काम सुरू आहे. या पुस्तकाचे नाव नाना फडणवीसाचे बारभाई कारस्थान हे असून याचा संदर्भ माझ्या जीवनाशी आहे. या पुस्तकात माझ्या जीवनातील घडलेल्या घटनेची नोंद या पुस्तकात पुराव्यानीशी मी देणार आहे. यावर पुस्तक लेखान करणारे लेखक माझ्याकडे येऊन गेले. हे पुस्तक लवकरच महाराष्ट्रच्या जनतेला वाचायला मिळणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीमधील ज्यांच्यावर भष्ट्राचाराचे आरोप आहे, अशा लोकांना भाजपात प्रवेश देवून त्यांना पवित्र करण्यात आले. मंत्री मंडळातील अनेक सहकारी होते की त्यांच्यावर आरोप झाले आणि त्यांना मुख्यमंत्र्यांनी क्लीनचिट दिली मात्र एकट्या या नाथाभाऊला क्लीनचीट न देण्याचे कारण काय? या प्रश्नाचे उत्तर मला शोधायचे असून आणि मी ते शोधणार असल्याचे नाथाभाऊ म्हणाले.

अनेकांच्या कुंडल्या जमा करण्याचे काम
वाढदिवसाच्या दिवशी नाथाभाऊ म्हणाले की, माझ्या जीवनात मी अनेक संकल्प केले त्याचीच पूर्तता अद्याप व्हायची बाकी आहे. सध्या मी कुठल्याही संवैधानिक पदावर नाही त्यामुळे मला आता भरपूर माहीती आता काढता येईल, आता कुठलेच माझ्यावर बंधन नाही त्यामुळे अनेकांच्या कुंडल्या आहे त्या काढता येतील, शोधता येतील, त्याचा अभ्यास करता येईल त्यानुसार पुढच्या कालखंडामध्ये माझ्याकडून जे शक्य होईल ते चांगले करण्याचे मी प्रयत्न मी करणार असल्याचे नाथाभाऊ म्हणाले.

आघाडीचे सरकार स्थिरच
महाविकास आघाडीचे सरकार लवकरच पडेल, असे भाजपाकडून सांगण्यात येत आहे यावर नाथाभाऊ म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार वर्ष-दिड वर्ष नक्कीच पडणार नाही आणि कोणाला पडायच स्वप्न पडत असेल तर मला माहिती नाही, असा खोचक टोलाही त्यांनी लगावत भाजपाला महाराष्ट्रमध्ये सत्तेत यायला 40 आमदारांची गरज असून इतर पक्षामधून 40 आमदार फुटतील, असे आता तरी मला वाटत नाही, भविष्यात सांगता येत नाही. भाजपाला सत्त्तेसाठी अख्या एका पक्षाची गरज आहे. राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस पक्षातील 40 आमदार फूटतील, असे मला अजिबात वाटत नाही. या तिघाही पक्षाची आपसात काही बिनसल तरच शक्य आहे. नव्याने निवडणुका होउ शकतात परंतु भाजपा सरकार हे येत्या सहा महिन्यात सत्तेत येईल, असे मला अजिबात वाटत नसल्याचे खडसे म्हणाले.

जनतेच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य
गेल्या 40 वर्षांपासून मी राजकारणात असून मागील 30 वर्ष मी आमदार म्हणून काम करत होतो. अनेक जनहिताचे प्रश्न मी सत्तेत नसतांना देखील सोडवले आहे. यंदाचा माझ्या वाढदिवसाला मला एवढीच खंत आहे की, विधानसभेत नसल्याने जनतेच्या समस्या तडीस नेवू शकत नाही तरी सुध्दा अनेक लोक माझ्याकडे येतात, समस्या मांडतात व सोडवण्यासाठी आग्रही असतात मी देखील त्यांच्या समस्या शासनाकडून सोडवत असतो, असेही खडसे म्हणाले.

Copy