काँग्रेसमधील गृहकलह

0

डॉ.युवराज परदेशी:

बिहारसह सात राज्यातील पोटनिवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा नाराजीचे फटाके फुटायला सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे ‘युवराज’ राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जाणार्‍या जवळपास प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसऐवजी भाजपालाच ‘अच्छे दिन’ येत असल्याने राहुल यांच्या नेतृत्वावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होणे स्वाभाविकच आहे. सतत होणार्‍या पराभवांवर आत्मचिंतन करण्याऐवजी काँग्रेसमधील गृहकलह दिवसेंदिवस वाढत चालला आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या पहिल्या फळीतील काही प्रमुखांसह 22 नेत्यांनी सोनिया गांधी यांना नेतृत्व बदलाविषयी पत्र लिहून जाहीर नाराजी व्यक्त केली होती. हा वाद शमविण्यात यश मिळत नाही तोच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिबल्ल यांनी पुन्हा एकदा स्वपक्षावरच कठोर टीका केली आहे. मोठा राजकीय इतिहास लाभलेल्या काँग्रेस पक्षाने निवडणुकीतील पराभवांना पक्षाचे ‘नशीब’ म्हणून स्वीकारले आहे. त्यामुळेच देशातील जनताही काँग्रेसला प्रभावी पर्याय मानत नाही, असे सिब्बल यांनी म्हटले आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीसह त्यानंतर देशभरात झालेल्या निवडणुकांपैकी दोन-चार निवडणुकांचा अपवाद वगळता सर्वच निवडणुकांमधील काँग्रेसची पीछेहाट हा निव्वळ योगायोग किंवा मोदी लाटेच्या राजकारणाचा परिणाम नाही. त्या स्थितीला ते स्वत:च जबाबदार आहेत. हे काँग्रेसचे अनेक नेते खाजगी बोलतांना मान्य करतात. याचीच परिणिती म्हणून 23 ज्येष्ठ नेत्यांच्या सह्या असलेला लेटरबॉम्ब गेल्या काही महिन्यांपूर्वीच फुटला होता. भाजपचा मुकाबला करायचा असेल तर काँग्रेसला उभे राहणे गरजेचे आहे. त्यासाठी काँग्रेसमध्ये समग्र बदल व्हायला हवा. खालच्या स्तरापासून वरपर्यंत नेतृत्वात बदल करण्यात यावा, अशी भूमिका या नेत्यांनी घेतली होती. यानंतर काँग्रेसची अध्यक्षपदाची भाकरी फिरणार का? असा प्रश्‍न उपस्थित झाला होता. यानंतर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अध्यक्षपद वगळता अन्य मोठे फेरबदल केले मात्र त्यात ‘सह्याजीरावांना’ डच्चू देवून गांधी घराण्याला आव्हान देणार्‍यांना स्पष्ट संदेश दिला.

सध्या कोरोना व्हायरस रोखण्यात अपयश आल्याची टीका भाजपावर विरोधकांकडून येत आहे. त्या जोडीला लॉकडाऊन व काही धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था आजारी पडली आहे, देशात बेरोजगारीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असल्याने मोदी सरकारला सर्वसामान्यांच्या रोषाला सामोर जावे लागत असल्याचे चित्र सोशल मीडियावर प्रतिबिंबी होते. या अडथळ्याच्या शर्यतीत व कोरोनाच्या संकटकाळात देशात पहिली निवडणूक झाली ती बिहार विधानसभेची! बिहारच्या निवडणुकीत राजदच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचा पराभव झाला. काँग्रेस देखील या महाआघाडीचा एक भाग होती. राजदने बलाढ्य भाजप व संयुक्त जनता दलाला टक्कर देत सर्वाधिक जागा मिळवल्या. मात्र, काँग्रेसने मागील निवडणुकीच्या तुलनेत अधिक जागा लढवूनही त्यांना फारसा प्रभाव पाडता आला नाही. काँग्रेसला केवळ 19 जागा मिळाल्या. त्यांच्या कमी जागांमुळेच महाआघाडीची पिछेहाट झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यातच निवडणुकीच्या काळात राहुल गांधी हे शिमल्यात पिकनिक करत होते, अशीही माहिती आता पुढे आल्याने राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या महाघाडीतील मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत.

राष्ट्रीय जनता दलाचे नेते शिवानंद तिवारी यांनी निवडणुकीतील पराभवाचे खापर काँग्रेससह राहुल गांधी आणि प्रियांका गांधींवर फोडत त्यांच्यावर टीका केली. दुसरीकडे गुजरात पोटनिवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. येथे काँग्रेसच्या 3 उमेदवारांची अमानत जप्त झाली आहे. उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवारांना काही जागांवर 2 टक्के पेक्षा कमी मते मिळाली आहेत. सिब्बल यांनी काँग्रेसच्या या अत्यंत वाईट कामगिरीवर पक्ष नेतृत्वाला लक्ष्य केले. ते म्हणाले, काँग्रेसने जणू प्रत्येक निवडणुकीत पराभव होणे हे पक्षाचे नशीब म्हणून स्वीकाले आहे. बिहार निवडणूक आणि इतर राज्यांच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या कामगिरीबाबत पक्षाच्या वतीने अद्याप काहीच भूमिका मांडण्यात आलेली नाही. कदाचित पक्षाला सर्वकाही ठीक वाटत असावे आणि त्यांना हा पराभवही त्यांना इतर पराभवांसारखा सामान्य वाटत असावा. गेल्या सहा वर्षांत आत्मपरीक्षण केले नाही. काँग्रेसचे नेमके काय चुकतेय, या महत्त्वाच्या विषावरील उत्तर शोधण्याची पक्षाची इच्छा नाही. कारण, काँग्रेस कार्यकारी समिती नामनिर्देशित सदस्यांचाच भरणा आहे.

प्रत्येक संघटनेत संवाद आवश्यक आहे, असेही सिब्बल म्हणाले. सिब्बल यांनी नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख थेट राहुल गांधींकडेच आहे. एकेकाळी देशातील सर्वात प्रबळ पक्ष असलेल्या काँग्रेसला गेल्या काही वर्षांपासून विशेषत: 2014 मध्ये आलेल्या मोदी लाटेपासून ओहटी लागली आहे. पक्षात जुन्या जाणत्या नेत्यांचा एक गट तर दुसरीकडे राहुल गांधी यांचा गट अशी उघड दुफळी दिसून येते. अनेक नेत्यांचा राहुल गांधींच्या कार्यशैलीला विरोध आहे. मात्र उघडपणे बोलण्याचे धाडस मोजकेच नेते करतात, त्याची किंमत देखील त्यांना चुकवावी लागते. एक गट हुजरेगिरी करण्यापलीकडे फारसा सक्रिय नाही तर एका गटाने अलिप्तता धोरण स्विकारलेले आहे. पक्षाचे काहीही होवो, आपले राजकीय स्थान टिकवण्यातच त्यांना जास्त रस दिसून येतो.

काँग्रेसमधील गृहकलहाची बंडाळी फोडण्यात राहुल गांधी यांना अपयश येत आहे, हे सांगण्यासाठी कुण्या ज्योतिषाची गरज नाही. राहुल यांच्या बाबतीत अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांनी व्यक्त केलेले मत खूप मार्मिक आहे. बराक ओबामा यांनी आपल्या पुस्तकात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत उल्लेख करतान म्हटले आहे की, राहुल गांधी हे एक नर्व्हस आणि अपरिपक्व व्यक्ती आहेत. एखादा विद्यार्थी जसा आपल्या अभ्यास करून शिक्षकांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याच्यामध्ये त्या विषयात प्राविण्य मिळवण्याची पात्रता नसते किंवा त्या विषयाबाबत आवडीचा अभाव असतो, तसं त्यांच्याबाबत घडत आहे. याच बरोबर, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा उल्लेख करत, ते एक अपार निष्ठा बाळगणारी व्यक्ती आहेत, असे ओबामा यांनी म्हटले आहे. काँग्रेसला गत वैभव प्राप्त करायचे असले तर त्यांना नेतृत्वाची भाकरी फिरवावीच लागेल!

Copy