काँग्रेसने भाकरी फिरवली पण…

0

डॉ.युवराज परदेशी:

2014 च्या लोकसभा निवडणुकीसह त्यानंतर देशभरात झालेल्या निवडणुकांपैकी दोन-चार निवडणुकांचा अपवाद वगळता सर्वच निवडणुकांमधील काँग्रेसची पीछेहाट हा निव्वळ योगायोग किंवा मोदी लाटेच्या राजकारणाचा परिणाम नाही. त्या स्थितीला ते स्वत:च जबाबदार आहेत. हे काँग्रेसचे अनेक नेते खाजगी बोलतांना मान्य करतात. याचीच परिणिती म्हणून 23 ज्येष्ठ नेत्यांच्या सह्या असलेला लेटरबॉम्ब गेल्या काही दिवसांपूर्वीच फुटला होता. भाजपचा मुकाबला करायचा असेल तर काँग्रेसला उभे राहणे गरजेचे आहे. त्यासाठी काँग्रेसमध्ये समग्र बदल व्हायला हवा. खालच्या स्तरापासून वरपर्यंत नेतृत्वात बदल करण्यात यावा, अशी भूमिका या नेत्यांनी घेतली होती. यानंतर काँग्रेसची अध्यक्षपदाची भाकरी फिरणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. यानंतर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अध्यक्षपद वगळता अन्य मोठे फेरबदल केले आहेत. यात ’सह्याजीरावांना’ डच्चू देवून गांधी घराण्याला आव्हान देणार्‍यांना स्पष्ट संदेश दिला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी देशभरातील काँग्रेसच्या 23 वरिष्ठ नेत्यांनी पक्षात मोठ्या बदलांची गरज असल्याचे मत व्यक्त करणारा लेटरबॉम्ब टाकल्यानंतर काँग्रेसमध्ये मोठा भुकंप झाला होता. या नेत्यांनी पक्षाला पूर्ण वेळ आणि प्रभावी अध्यक्ष गरजेचा असल्याची महत्त्वाची मागणी सोनिया गांधी यांच्याकडे केली होती. यामध्ये गुलाब नबी आझाद यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांचा समावेश होता. त्यामुळे पक्षात वाद निर्माण झाला होता. मात्र, यानंतर झालेल्या काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत सोनिया गांधी यांची पुन्हा पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली. यानंतर काँग्रेस नेतृत्वाने पक्ष संघटनेत मोठे फेरबदल करण्यात आले असून गुलाम नबी आझाद यांची महासचिव पदावरून उचलबांगडी झाली आहे. पक्षसंघटनेत आमूलाग्र बदलाचा आग्रह धरून पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिणार्‍या 23 ज्येष्ठ नेत्यांमध्ये आझाद यांचा समावेश होता. आझाद यांच्यासह जुने-जाणते नेते, मोतीलाल व्होरा, अंबिका सोनी, मल्लिकार्जुन खरगे आणि लुईजिन्हो फलेरिओ यांनाही डच्चू देण्यात आला आहे. आझाद, आनंद शर्मा, मुकुल वासनिक या तीनही बंडखोर नेत्यांना पक्षाच्या कार्यसमितीच्या सदस्यपदी कायम ठेवण्यात आले आहे. परंतू मुकुल वासनिक यांच्याकडे आधी चार राज्यांचा प्रभार होता. त्यामधील तीन काढून घेण्यात आले असून एक कायम ठेवला आहे. फेरबदलात राहुल गांधी यांचे विश्वासू व राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांना सर्वाधिक राजकीय लाभ झाला. त्यांना महासचिवपदी बढती दिली असून त्यांच्याकडे कर्नाटकची जबाबदारी असेल. तसेच, हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या मदतीसाठी नव्याने स्थापन केलेल्या विशेष समितीतही त्यांना सदस्य करण्यात आले आहे. राजस्थान काँग्रेसच्या बंडखोरीत निरीक्षकांची भूमिका बजावणारे व नवनियुक्त प्रभारी अजय माखन यांना महासचिव बनवण्यात आले आहे.

सोनिया गांधी यांनी अचानक केलेल्या या फेरबदलांबाबत पक्षांतर्गतच दोन वेगवेगळे मतप्रवाह दिसून येत आहेत. याचा पक्षाला कितपत फायदा होईल, याचे उत्तर आगामी काळात मिळेलच. यात महत्त्वाचा विषय म्हणजे काँग्रेसला 2014 नंतर लागलेली घरघर, उतरती कळा अजूनही थांबायचे नाव घेत नाही. याची कारणमिमांसा व मंथन काँग्रेसमध्ये सुरु असताना राष्ट्रीय नेतृत्वाच्या मुद्यावरुन काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे चित्र आहे. काँग्रेसकडे अनेक रथी महाराथी, लढवय्ये नेते असले तरी काँग्रेसला गतवैभव पुन्हा प्राप्त करुन देणारा ‘सेनापती’ हवा आहे, असा सुरु काँग्रेसमधून उमटू लागला आहे. याकरीताच काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांनी पक्षनेतृत्वाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली होती. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधी यांच्याकडे हंगामी अध्यक्षपद सोपवण्यात आले होते. तेंव्हापासून काँग्रेसच्या सेनापतीपदावरुन चर्चा रंगत आहेत. काँग्रेसचा अध्यक्ष बिगर गांधी कुटुंबिय असावा, अशी भूमिका खुद्द प्रियंका गांधी यांनी मांडल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली. या विषयावर आवाज उठवणार्‍या नेत्यांच्या मतावर मंथन करण्याऐवजी त्यांनाच दणका देण्याचा प्रकारण नव्या कार्यकारणीवरुन दिसून येतो. पृथ्वीराज चव्हाण यांना संघटनात्मक पातळीवर कुठली जबाबदारी मिळते हे स्पष्ट झालेले नाही कारण नव्या बदलांमध्ये त्यांचे नाव कुठेही दिसत नाही. वर्किंग कमिटीत शशी थरूरस मनीष तिवारी यांना स्थान मिळू शकले नाही. काँग्रेस हा देशातील सर्वात मोठा व जूना पक्ष आहे.

पक्षांतर्गत बदल हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. मात्र पक्षात लोकशाही नव्हे तर गांधी घराणेशाही चालते, या विरोधकांच्या आरोपाला पुन्हा खतपाणी मिळणार आहे. देशाच्या 70 वर्षांच्या इतिहासात 50 वर्षापेक्षा जास्त सत्ताकाळ भोगणार्‍या काँग्रेसची सध्याची अवस्था खूपच खराब आहे. नेकमं काँग्रेसचे धोरण काय आहे? याबाबत कुणातही एकवाक्यता नाही. केवळ विरोधाला विरोध म्हणून पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांना लक्ष केले गेल्यामुळे काँग्रेसला मोठी किंमत चुकवावी लागली आहे. पाकिस्तानवरील सर्जिकल स्ट्राईक, भारत-चीन सीमेवरील तणाव, देशद्रोही कृत्य करणार्‍यांचे समर्थन, अशा अनेक चुका काँग्रेसला भोवल्या आहेत. काँग्रेसमधील वाचाळवीर नेत्यांना आवरण्याआधी कुणीतरी राहुल गांधी यांना देखील समजविण्याची आवश्यकता आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने काँगेसने कात टाकून पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरायचे असेल तर पक्षांतर्गत गटबाजी मोडून काढत व हुजरेगिरी करणार्‍यांना दूर ठेवावे लागणार आहे. तरच काँग्रेसला गतवैभव प्राप्त होवू शकते. सोनिया गांधी यांनी सध्या जे पक्षात मोठे फेरबदल केले आहेत. याचा नेत्यांना जो संदेश द्यायचा होता तो दिला आहे.