काँग्रेसने देशाची वाट लावली, आम्ही आता सुधारणा करीत आहोत

0

बर्‍हाणपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टिका ; विधानसभा निवडणुकीतील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा

रावेर- देशावर 50 वर्ष राज्य करून गरीबी हटावोचा नारा देत काँग्रेस सरकारने सत्ता उपभोगली मात्र प्रत्यक्षात गरीबी हटलीच नाही मात्र संपूर्ण देशाची वाट काँग्रेसने जरूर लावली असून भाजप सरकार आता परीस्थिती सुधारत असल्याचे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बर्‍हाणपूर येथे केले. बर्‍हाणपूर विभानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपा उमेदवार अर्चना चिटणीस यांच्या प्रचारार्थ शनिवारी दुपारी 12.30 वाजता त्यांची लालबाग चौकातील सागर टॉवर मैदानावर जाहीर सभा झाली. याप्रसंगी ते बोलत होते.

आठ वर्ष स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी डांबल्या
शनिवारी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्र्यांची सभा होणार असलीतरी नियोजित वेळेपेक्षा दिड तास उशिराने ते दाखल झाले. सभास्थळी त्यांचे आगमन झाल्यानंतर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे त्यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आल्यानंतर सभेला सुरूवात झाली. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी न स्वीकारल्याची भाजपा सरकारवर टिका झाली, मोर्चे निघाले मात्र प्रत्यक्षात 2005 मध्ये अहवाल सादर करण्यात आला व 2006 ते 2014 या काळापर्यंत काँग्रेस सरकारने त्याबाबत कुठलाही निर्णय घेतला नाही. तब्बल आठ वर्ष काँग्रेस सरकारने शिफारशींसह अहवाल डांबून ठेवला, भाजप सरकारने मात्र शिफारशी स्वीकारून शेतकर्‍यांच्या शेतीमालाला दिडपट हमीभाव जाहीर केला. काँग्रेस पक्ष शेतकरी विरोधी असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.

चोर, उच्चक्के आता हिशोब मागायला उभे राहत आहेत
मुख्यमंत्री म्हणाले की, काँगे्रसला कुठल्याही परीस्थितीत आता देशात सत्ता हवी असल्याने ते कुठल्याही स्तरावर जायला तयार आहेत. देवाला व जनतेला खोटी आश्‍वासने द्यायची नसतात मात्र काँग्रेसने केवळ घोषणाबाजी चालवली आहे. काँग्रेसने 50 वर्ष गरीबी हटावोचा नारा दिला मात्र गरीबी हटली नाही तर त्यांनी मात्र सत्ता उपभोगल्याचे ते म्हणाले. आम्ही चार वर्षात काय केले याचा हिशोब आता चोर, उचक्के मागायला निघाल्याचाही घणाघातही त्यांनी विरोधकांवर केला. पंतप्रधान मोदी सरकारने पिण्यासाठी स्वच्छ पाणी, घरे, शौचालये देवून गरीबांच्या जीवनात परीवर्तन घडवले. जन धन योजनेद्वारे 30 कोटी लोकांची खाती उघडण्यात आली व डीबीटी योजनेद्वारे विविध शासकीय योजनांचे पैसे थेट लाभार्थींच्या खात्यात जमा होवू लागल्याचे त्यांनी सांगत तब्बल 75 हजार कोटी रुपये जे दलाल खात होते ते आता थेट गरीबांच्या खात्यात जमा होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी ठासून सांगितले.

न खाऊंगा न खाने दुंगा ; मोदीजी प्रधानसेवक
पंतप्रधान मोदीजी हे प्रधानसेवक असून एक-एक पैसा त्यांनी जनतेपर्यंत पोहोचण्याची जवाबदारी घेतली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत देशातील एकही जण बेघर राहणार नाही याबाबत मोदीजी यांनी धोरण ठरवल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री शिवराज चौहाण यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक करून त्यांच्याकडून आम्ही अनेक गोष्टी शिकत असल्याचे ते म्हणाले. यापूर्वी नागरीकांच्या दुःखात केवळ कुटुंबातील लोक व आप्तेष्ट सहभागी व्हायचे आता मात्र तुमच्या अडचणीत भाजपा सरकार उभी असल्याचे सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

देशातील सर्वात मोठी आयुष्यमान योजना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात मोठी आयुष्यमान योजना सुरू केली असून या योजनेत पाच लाखांपर्यंतचा औषधांचा व उपचाराचा खर्च केला जात आहे. अमेरीकेचे तत्कालीन राष्ट्रपती बराक ओबामा यांनीही अशाच पद्धत्तीने योजना सुरू केली होती मात्र तिचा केवळ दहा कोटी लोकांना लाभ घेता आला मात्र भारतातील या योजनेमुळे तब्बल 50 कोटी लोकांना लाभ मिळणार असल्याचे फडणवीस म्हणाले. राहुल गांधींविषयी आता बोलण्यासारखे काहीही राहिले नसल्याचे त्यांनी टिका करीत चीनच्या सैनिकांनी जेव्हा डोकलाममध्ये आक्रमण केल्यानंतर भारतीय सैन्यांनेही एक पाऊल पुढे टाकत चीनला नमवत माघार घ्यायला भाग पाडल्याची त्यांनी आठवण सांगून सभेत जोष भरला. तसे केले नसतेतर कदाचित देश स्वतंत्र राहिला नसल्याचेही ते म्हणाले.

Copy