काँग्रेसतर्फे आजपासून जन जागरण अभियान

काँग्रेसचे प्रभारी राजाराम पानगव्हाणे यांची पत्र परिषदेत माहिती

नंदुरबार। केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी काँग्रेसतर्फे जन जागरण अभियान राबविले जात आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातही 14 ते 19 नोव्हेंबर 2021 दरम्यान अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेसचे प्रभारी राजाराम पानगव्हाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी मंत्री पद्माकर वळवी, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, रणजीत पावरा, राजेंद्र पाटील, हेमलता शितोळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसच्या जनजागरण अभियानाचा आढावा घेण्यासाठी जिल्हा प्रभारी राजाराम पानगव्हाणे हे येथे आले होते.

ते म्हणाले की, केंद्र सरकारने महागाई वाढवून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. या धोरणाच्या विरोधात लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी गावागावात जाऊन जनजागरण अभियान राबविले जाणार आहे. अभियान दरम्यान काँग्रेसची सदस्य नोंदणीही केली जाणार आहे. लोकसभा मतदार संख्येच्या दीडपट अधिक सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आदिवासी कलापथक, तरुण-तरुणींचे पथक गावागावात जाऊन केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध लोकांमध्ये जनजागरण करणार आहेत. अभियानात जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राजाराम पानगव्हाणे यांनी केले आहे.

Copy