काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावीत काळाच्या पडद्याआड

Former Union Minister of State for Home Manikrao Gavit passed away नवापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावीत (88) यांचे शनिवारी सकाळी आठ वाजता अल्पशा आजाराने नाशिकच्या सुयश खाजगी रुग्णालयात निध झाले. गावीत निधनामुळे धुळे व नंदुरबार जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. रविवार, 18 सप्टेंबर रोजी त्यांच्या धुळीपाडा येथील अंत्यसंस्कार करण्यात येतील तर पार्थिव नाशिकहून आज नवापूरातील सुमाणिक चौकातील राहत्या घरी आणण्यात येणार आहे.

धुळे व नंदुरबार जिल्ह्यात शोककळा
माणिकराव गावित यांच्या पश्चात एक मुलगा माजी जि.प.अध्यक्ष व विद्यमान सदस्य भरत गावीत, तीन मुली माजी आमदार निर्मला गावित, प्रा.डॉ.जयश्री गावीत, निता गावीत, सुन, जावई, नातवंड असा परीवार आहे.

विविध पदे भूषवली
कै.माणिकराव गावीत यांनी 1965 पासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. 1965 ते 71 या कालावधीत ते तत्कालीन नवापूर ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून निवडून आले होते. न 1971 मध्ये ते तत्कालीन धुळे जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून निवडून आले होते. त्यांनी 1971 ते 78 या काळात तत्कालीन धुळे जिल्हा परिषदेत समाजकल्याण समितीचे सभापती म्हणून काम पाहिले. 1978 ते 84 या काळात धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष होते. दरम्यान, सलग नऊ वेळा नंदुरबार लोकसभा मतदार संघात निवडून कै.माणिकराव गावीत यांनी विक्रम केला मात्र, 16 व्या लोकसभेत त्यांचा खा.हिना गावित यांनी 1 लाखांवर मतांनी पराभव केला होता. तेव्हापासून मात्र, ते राजकारणापासून अलिप्त होते.

नाशकात घेतला अखेरचा श्वास
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खराब असल्याने नाशिक येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते शनिवार, 17 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांची अंत्ययात्रा रविवार, 18 रोजी सकाळी 11 वाजता नवापूर येथील सुमाणिक चौक येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघेल.