काँग्रेसकडून शिकावे!

0

महाराष्ट्रात पुलोदनंतर काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या विभिन्न विचारसरणी असलेल्या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीचे ‘ठाकरे सरकार’ स्थापन केले. एकत्र मोट बांधण्याचा हा प्रयोग म्हणजे सरकार नव्हे, तर कसरत आहे आणि ती यशस्वीरित्या सांभाळण्याचा अनुभव काँग्रेस व राष्ट्रवादी यांना आधीपासूनच आहे. यापूर्वी या दोन्ही पक्षांनी महाराष्ट्रात आघाडी करून सरकार स्थापन केले होते. परंतु, शिवसेना याबाबतीत आज नवखी आहे. हा पक्ष 1995 पासून ते 2019 पर्यंत भाजपासोबत होता. दोघांच्या मैत्रीचा एकसमान धागा होता. तो म्हणजे हिंदुत्त्व! आता तसे राहिलेले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीला सोबत घेताना शिवसेनेला काही विचारांना मुरड घालावी लागली आहे. अर्थात त्याचे फळ त्यांना मिळाले. त्यांच्या मनाजोगते सरकार स्थापन झाले आहे. परंतु, यापुढील वाटचाल सोपी नाही. भाजपाने उमेदवारांना आयात करण्याच्या नादात स्वतःचे नुकसान कसे करून घेतले हे आज महाराष्ट्रातील जनतेसमोर आहे. शिवसेनेनेदेखील महाविकास आघाडीसाठी काही तडजोडी केल्या आहेत पण त्यातून या पक्षालाही ताप होत असल्याचे गेल्या काही दिवसांतील घटनांमधून समोर आले आहे. ठाकरे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिली कसोटी मंत्रिपदाची आणि दुसरी खातेवाटपाची होती. मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट अथवा राज्यमंत्रिपदाचे स्वप्न साकार न झालेले शिवसेनेतील 14 आमदार नाराज असल्याचे वृत्त गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावलेले खा. संजय राऊत हे आपले बंधू आ. सुनील राऊत यांना मंत्रिपद न मिळाल्याने खट्टू झाल्याची चर्चा जोरात होती. नाराजांच्या यादीत भास्कर जाधव यांचेही नाव समोर आले. पण ही सर्व नाराजी त्या क्षणापुरती अथवा कालावधीपुरती मर्यादित राहिलेली आहे. त्याचा विस्फोट झालेला नाही. भाजपा तर वाटच पाहत आहे की, शिवसेनेतून मोठा गट फुटून केव्हा एकदा आपल्या गळाला लागेल? तसेही भाजपाचे वर्णन ‘पाण्याविना मासा’, अशाचप्रकारे शिवसेनेच्या गोटातून केले जाते. एका संकटातून बाहेर निघत नाही तोच औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेनेला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचे निमित्त त्यासाठी पुरले. त्यापायी मुंबई चिंतीत झाली. या निवडणुकीत ‘मातोश्री’चे आदेश झिडकारले जाणे हे चांगले लक्षण नाही मात्र, ते घडले आहे. पूर्वीश्रमीचे काँग्रेसी आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेत प्रवेश केलेले सिल्लोडमधील बडे प्रस्थ, आमदार अद्बुल सत्तार यांच्या सोयीस्कर गप्प राहण्यामुळे औरंगाबाद जि.प. निवडणुकीत त्यांच्याच पक्षाची दाणादाण उडाली. त्यामुळे शिवसेनेची नाचक्की झाली. कॅबिनेट मंत्रिपद न मिळणे आणि औरंगाबद जि. प. अध्यक्षपद निवडीत डावलले जाणे आदी कारणांमुळे सत्तार नाराज असल्याची चर्चा होती. त्यांनी आपले उपद्रव मूल्य नेतृत्त्वाला दाखवून देण्यासाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा मुहूर्त साधला असावा. कारण, ही निवड होऊन गेल्यानंतरच आ. सत्तार यांनी नाराजीचे वृत्त फेटाळून लावले आहे.

राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग आताच झाला असला, तरी त्याची पायाभरणी तीन वर्षांपूर्वी औरंगाबाद जि.प.मधील सत्तेसाठी शिवसेना व काँग्रेसने केली होती. तेव्हा ठरलेल्या सत्ता समीकरणांनुसार, अडीच वर्षांनंतर काँग्रेसला अध्यक्षपद देण्याचा शब्द शिवसेनेने पाळला. त्यासाठी जि. प. मध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीची सत्ता यावी म्हणून प्रयत्न केले जात होते. परंतु, जि. प. च्या विद्यमान अध्यक्षा व शिवसेनेच्या अ‍ॅड. देवयानी डोणगावकर यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समर्थक सहा सदस्यांना सोबत घेत ऐनवेळी बंडखोरी केली. ‘मातोश्री’चे आदेश डावलून अध्यक्षपद मिळविण्यासाठी त्यांनी थेट भाजपाशी संधान साधले. शिवसेनेला चारीमुंड्या चित करण्याची आयती संधी चालून आली म्हटल्यावर जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाने शिवसेनेच्या बंडखोरासाठी एक पाऊल मागे घेतले. अगदी अटीतटीची हा सामना होता. अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या मीना शेळके व भाजपाच्या उमेदवार अ‍ॅड. देवयानी डोणगावकर यांना 30-30 अशी समान मते मिळाली. यानंतर काढण्यात आलेल्या चिठ्ठीत काँग्रेसच्या मीना शेळके यांची अध्यक्षपदी निवड झाली. उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत महाविकासाघाडीची दोन मते फुटल्यामुळे भाजपाला 32 व शिवसेनेच्या उमेदवाराला 28 मते मिळाली. यामुळे शिवसेनेला धक्का देत भाजपाचा उपाध्यक्ष झाला. अध्यक्षपदही भाजपाला मिळाले असते. परंतु, एका ‘चिठ्ठी’मुळे घोळ झाला, अन्यथा सरकार स्थापनेनंतर औरंगाबाद गमावणे ही घटना शिवसेनेसाठी खरोखर नाचक्की ठरली असती. या शहरातून शिवसेनेचा विस्तार मराठवाड्यात झाला आहे. पक्षाच्या सुदैवाने सत्तांतर तूर्तास टळले आहे. या सर्व घडामोडीत आ. अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची, लवकरच ते आमदाराकीचाही राजीनामा देणार असल्याची चर्चा जोरात होती. त्यांची समजूत काढण्यासाठी शिवसेना नेत्यांची धावाधाव सुरू होती. माजी खासदार चंद्रकांत खैरे संतप्त होऊन सत्तार यांची निर्भत्सना केली तरीही सत्तार बधले नाही वा एक शब्दही माध्यमांपुढे बोलले नाहीत. या दरम्यान, जिल्हा परिषदेत जोरदार घडामोडी सुरू होत्या. भाजपाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. त्यानंतर सत्तारांनी, “माझ्या राजीनाम्याच्या वावड्या उठवण्यात आल्या होत्या,” असे स्पष्ट केले. त्यांनी सकाळीच आपल्याविषयीचे गैरसमज दूर केले असते तर पुढचे महाभारत कदाचित घडले नसते. अध्यक्षपदाची भाजपाची संधी हुकल्यानंतर सत्तारांनी आपली बाजू मांडणे हेच मुळी संशयास्पद आहे. शिवसेनेतही आयाराम आहेतच. त्यांचीही महत्त्वाकांक्षा आहे. त्या फलद्रूप होणार नसतील, तर शिवसेनेला ‘नाराजीनाट्या’ची सवय करून घ्यायला हवी. ते आज काँग्रेससोबत सत्तेत आहेत. या पक्षाचे एक विशेष आहे. त्याचे अनेक तुकडे झाले, अंतर्गत बंडाळ्या झाल्या, एकनिष्ठ म्हणविणारे आपलेच लोक सोडून गेले तरीही हा पक्ष टिकून आहे. फरक एवढाच की, तो कधी सत्तेबाहेर तर कधी सत्तेत असतो.

Copy