कष्टकरी असंघटीत कामगारांचे प्रश्‍न हिवाळी अधिवेशनात मांडणार

0
आमदार महेश लांडगे यांनी दिले आश्‍वासन 
भोसरी : कष्टकरी आणि असंघटित कामगारांचे प्रश्‍न व समस्या आहेत, याला शासकीयस्तरावर सोडवण्यासाठी हिवाळी अधिवेशनात मांडणार, असे आश्‍वासन आमदार महेश लांडगे यांनी दिले. कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्यावतीने आयोजित केलेला असंघटीत कामगार मेळावा चिंचवड येथे पार पडला. मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. महिला आरोग्य शिबिराचे उद्घाटन महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते होते. यावेळी नगरसेवक तुषार हिंगे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, उद्योजक कार्तिक लांडगे, स्विकृत सदस्य जितेंद्र पवार, डॉ.गणेश अंबिके, आदित्य बिर्ला हॉस्पिटलचे  डॉ.संकेत जैन, सूरज भंडारे, डॉ.सरोज अंबीके, पांडुरंग साने, विनायक मोरे आदी उपस्थित होते. यावेळी आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल व मोरया सामाजिक प्रतिष्ठानच्या सहकार्याने कष्टकरी महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यात 360 महिलांनी सहभाग घेतला.
फेरीवाला घटकाला न्याय
आमदार लांडगे पुढे म्हणाले की, शहरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कामे हे असंघटित कामगार करत असून विकासात त्यांचा हातभार आहे हे नाकारता येणार नाही. या कामगारांचे प्रश्‍न, आरोग्य, सुरक्षा, वेतन आदी मुद्दे घेऊन येत्या अधिवेशनात मांडनार आहे. तसेच फेरीवाला घटकाला लवकर न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. नेता कोणत्याही संघटनेचा, पक्षाचा असो पण जो समस्या मार्गी लावणारा आहे त्याच्या पाठीशी सारे उभे रहातात. काशिनाथ नखाते हे तुमच्या हक्कासाठी अविरत लढा देणारे आहे. त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजेत. मी ही देखील त्यांच्या पाठीशी कायम राहील.
घरकुल योजनेत राखीव घरे
यावेळी काशीनाथ नखाते समस्या मांडताना म्हणाले की, सन 2008 मध्ये केंद्र सरकारने सामाजिक सुरक्षा कायदा केला मात्र त्याची अंमलबजावणी राज्य सरकारवर सोपवली. आर्थिक निधी मुळे हा कायदा प्रत्यक्ष अंमलात आणला नाही. असंघटित कामगारांचे प्रश्‍न गंभीर असून कामाच्या ठिकाणी त्यांना सुरक्षा साधने नसल्याने अनेक ठिकाणी अपघाती मृत्यू होत आहेत. संबंधित ठेकेदार हात झटकतो, हे रोखले पाहिजे. घर कामगारांचा निधी अनेक दिवसांपासून रोखून ठेवला आहे, तेदेखील सुरु व्हावे. असंघटितांसाठी मुख्यमंत्र्यांनी मागील अर्थसंकल्पात तरतूद केली, मात्र राज्यात लागु झाले नाही. मनपाच्या घरकुल योजनेत या कामगारांसाठी घरे राखीव ठेवावीत. सूत्रसंचालन दत्तात्रय तरटे यांनी केले तर आभार मधुकर वाघ यांनी मानले.