कळमसरे येथे सहा दुकाने फोडली

0

अमळनेर । अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथे शनिवारी मध्यरात्री रात्री चोरट्यांनी चांगलाच धुमाकुळ घालत बियार शॉपसह सहा दुकाने फोडल्याची घटना घडली. यावेळी चोरट्यांनी बाबुलाल पाटील यांच्या मालकीचे त्रिमूर्ती बियर शॉप मधून 41 हजारांची रोकड तसेच 1 हजार 450 रुपये किंमतीच्या 13 बियरच्या बाटल्या लंपास केले आहेत तर इतर दुकानांमधून 6 हजार 750 रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेले आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळमसरे येथील रहिवासी बाबुलाल पाटील यांचे गावात त्रिमुर्ती बियर शॉप आहे. शनिवारी 14 रोजी नेहमीप्रमाणे पाटील हे शॉप बंद करून घरी निघून गेले. या दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूप टॅमीच्या सहाय्याने तोडून दुकानात चोरी करून पसार झाले. रविवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास दुकानात आले. दुकानाच्या अंगणात साफसफाई करत असतांना त्यांना दुकानाचे कुलूप तोडलेले दिसले. दुकानात प्रवेश केल्यानंतर त्यांना सामान अस्ताव्यस्थ फेकलेले दिसून आले तर शापची पाहणी केल्यानंतर 41 हजारांची रोकड तसेच 1 हजार 60 रुपये किंमतीच्या 8 बाटल्या तर 390 रुपये किंमतीच्या 330 एमएलच्या 5 बाटल्या असे एकूण 42 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे त्यांना आढळून आले.

या ठिकाणीही झाल्या चोर्‍या
मध्यरात्री बाबूलाल पाटील यांचे बियर शॉप चोरट्यांनी फोडल्याचे सकाळी उघडकीस आल्यानंतर त्याच जवळच्या परिसरातील पाच दुकाने चोरट्यांनी फोडल्याचेही समोर आले. त्यात मुक्ताई पानसेंटरमधून 1200 किंमतीचे 10 व 5 रूपयाचे शिक्के, सुदाम कोळी यांच्या म्हाळसा ट्रेडर्स दुकानातून 1500 रूपयांचा नोटा, गुरुदत्त पान सेंटरचे मालक रतिलाल पाटील यांच्या दुकानातून 1000 रूपये किंमतीच्या विविध नोटा, पंकज किराणातून 2000 रूपयाची चिल्लर अशी सहा दुकानात एकूण 49 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल चोरी करून चोरट पसार झाले. मध्यरात्री चोरट्यांनी सहा दुकाने फोडल्याने कळमसरे गावात चोरट्यांनी घातलेल्या या धुमाकुळमुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून घरफोडींच्या घटना शांत झाल्या होत्या. परंतू आता चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले असल्याचे दिसून येत आहे.

गुन्हा दाखल
ठसे तज्ञ पोलीस कॉन्स्टेबल साहेबराव चौधरी, दीपक चौधरी यांनी नमुने घेतले एका डब्यावर ठसा आढळून आल्याने चौकशीसाठी जळगावला घेऊन गेले. घटनेचा पुढील तपास अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. प्रभाकर कंखरे, पो.कॉ. श्रीराम पाटील, कैलास चव्हाण करीत असून मारवड पोलिस स्टेशनला भाग 5 गुरनं 3/2017 भादंवि 457, 380, 461 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चोरट्यांचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेमुळे मात्र गावात भितीचे वातावरण परसरले आहे.

पोलीसांची घटनास्थळी धाव
सहा ठिकाणी चोर्‍या झाल्याची माहिती मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना मिळाली. त्यानंतर अवतारसिंग चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली व चोरी झालेल्या दुकानांची पाहणी करून सदर घटनेची माहिती चव्हाण यांनी अमळनेर उपविभागीय पोलिस अधिकारी आर.एस. पवार तसेच जळगाव गुन्हे अन्वेषण विभाग श्‍वान पथक, ठसेतज्ञ पथक यांना कळविले. त्यांनीही घटनास्थळी येऊन श्‍वान पथक प्रमुख संदीप परदेशी, मनोज पाटील, पोलीस श्‍वानास चोरीच्या जागेवरून कळमसरे ते पानसरेकडे चोरीचा मार्ग दाखविला. तसेच कळमसरे/ वासरे दरम्यान चोरट्यांनी बियरच्या खाली बाटली त्या ठिकाणी फेकून त्यांनी वाडसे गावाकडे यात्रेनिमित्त तमाशा पाहवयास गेल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.