कर कपातीनंतर पुन्हा पेट्रोलचे दर वाढले

0

मुंबई-केंद्र आणि राज्य शासनाने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. डिझेलच्या दरांमध्ये काल शनिवारी आणखी काही पैशांची घट झाली, मात्र करकपात झाल्यानंतर डिझेलसह पेट्रोलच्या दरांत आज पुन्हा काही पैशांनी वाढ झाली आहे. दुसऱ्याच दिवसापासून पेट्रोलच्या दरात वाढ सुरू झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये प्रति लिटर १४ पैशांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर १४ पैशांनी तर डिझेलचे दर प्रति लिटर ३१ पैशांनी वाढले आहेत. मुंबईमध्ये आता पेट्रोल प्रति लिटर ८७.२९ रूपयांनी मिळणार आहे. तर डिझेल ७७.०६ रूपये प्रति लिटर मिळेल.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पाच रुपयांची घट होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी प्रत्यक्षात पेट्रोलच्या दरामध्ये ४.३६ रुपयांनी, तर डिझेलच्या दरामध्ये केवळ २.५९ रुपयांची कपात करण्यात आली. २०१४ मध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर ६० रुपयांच्या आसपास होता. २०१७ मध्ये तो ८० रुपयांच्या पुढे गेला आहे. मागील महिन्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर पाच ते सहा रुपयांनी वाढले होते. त्यामुळे सर्वच नागरिकांसह वाहतूकदारांनाही त्याची झळ बसत होती.

Copy