Private Advt

कर्नाटक राज्यातील लूटीचे यावल कनेक्शन : तरुण ताब्यात तर दुसरा पसार

यावल : कर्नाटक राज्यात झालेल्या लूट प्रकरणी यावल कनेक्शन स्पष्ब् झाल्यानंतर गुरूवारी कर्नाटक पोलिसांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने शासकीय कार्यालयात कर्मचारी म्हणून असलेल्या कर्मचार्‍याच्या मुलास ताब्यात घेतले तर उभयंतांच्या घरात असलेल्या अन्य एक संशयीत पोलिसांचा ताफा पाहून पसार झाला. आदित्य सत्यवान पवार असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे तर शिवकुमार हा पसार झाला असून त्याचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्ह्यात वाघझिरा आश्रम शाळेत अधीक्षिका असलेल्या तरुणीचा मोबाईलचा वापर झाल्याने या तरुणीच्यादेखील अडचणीत वाढ झाली आहे.

कर्नाटकात व्यापार्‍याची झाली होती लूट
गत महिन्यात 22 सप्टेंबर 2021 रोजी कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील शांतापूर पोलीस स्टेशन हद्दीत पाच जणांच्या टोळक्याने एका व्यापार्‍याचे सहा लाख रुपये लुटून पळ काढला मात्र कर्नाटक पोलिसांनी तीन संशयीतांना अटक केली होती तर त्यातील दोन संशयीत आरोपी हे यावल शहरात असल्याची माहिती कर्नाटक पोलिसांना मिळाली. यातील एक संशयीत एका तरुणीच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुरूवारी पहाटे कर्नाटक पोलिसांचे पथक यावलमध्ये धडकले. पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, सुशील घुगे, राजेश वाढे, भुषण चव्हाण, राहुल चौधरी, अशोक बाविस्कर आदींच्या पथकाने वाघझिरा आश्रमशाळेत अधीक्षक असलेल्या तरुणीचा शोध सुरू केल्यानंतर ही तरुणी यावल बसस्थानकावर असल्याचे कळताच पथकाने धाव घेतली असता तरुणीसोबत पोलिसांना हवा असलेला तरुण आदित्य सत्यवान पवार देखील असल्याचे दिसताच त्याच्याही मुसक्या आवळण्यात आल्या. विशेष म्हणजे दुसरा हवा असलेला संशयीत शिवकुमारदेखील आदित्य पवारच्या घरात आश्रयास असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास ताब्यात घेण्यासाठी पथक निघाले मात्र पोलिसांचा ताफा आल्याची कुणकुण संशयीताला लागताच तो पसार झाला.

आश्रमशाळा अधीक्षिका अडचणीत
आदित्य पवार हा यावल प्रकल्प कार्यालयातील ग्रंथपाल सत्यवान पवार यांचा मुलगा आहे. ते मुळचे सोलापूरचे रहिवासी असून कर्नाटक पोलिसांनी केलेल्या तपासात आदित्य पवारने वाघझिरा आश्रमशाळेच्या अधिक्षीका सृष्टी निकाळजेचा मोबाईल गुन्ह्यात वापरला तर शिवाय तरुणीच्या फोन पे वर 50 हजारांची रक्कम देखील टाकल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.