कर्तव्याची जाणीव ठेवून विकास करा

0

  शिंदखेडा येथील न्या. पवन बनसोड यांचे प्रतिपादन
  वरपाडे येथे कायदेविषयक साक्षरता शिबीर
  विविध शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे उद्घाटन

शिंदखेडा – भारत देशाच्या संविधानात या देशातील नागरिकांना समान न्यायाचा अधिकार देण्यात आला असून त्यामुळे गरीब असो वा श्रीमंत अथवा कोणत्याही धर्माचा असो त्यांना कायद्याचा आधार घेत समान न्याय देण्यात येतो. संविधानामध्ये देण्यात आलेल्या अधिकारा बरोबरच कर्तव्याची जाणीव या देशातील प्रत्येक नागरिकाने ठेवल्यास गावामध्ये विविध विकासाची कामे होऊन गावाचा विकास पर्यायाने देशाचा विकास होईल असे प्रतिपादन शिंदखेडा येथील दिवाणी न्यायाधीश न्या. पवन बनसोड यांनी केले. आज सोमवारी तालुक्यातील वरपाडे येथे आयोजित कायदेविषयक साक्षरता शिबिर व विविध शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

मेळाव्यात यांची होती उपस्थिती
या महामेळाव्याचे आयोजन शिंदखेडा तालूका विधी सेवा समिती व वरपाडे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या कार्यक्रमास ग्रामपंचायत सरपंच संगीताबाई बागल, तालुका वकील संघाचे सचिव एच.बी. अहिरराव, वकील संघाचे अध्यक्ष एन.बी. मराठे, सरकारी अभियोक्ता अॅड.महेश पाडवी, अॅड.व्ही.एल. पाटील, पोलीस निरीक्षक भरत जाधव, अॅड.बी.झेड. मराठे, अॅड.व्ही. ए.पवार, तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी शिंदखेडा न्यायालयाचे विवेक पंचभाई, तलाठी तुषार पवार, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. डि.बी. सोनवणे यांनी केले.या शिबीरास वरपाडे व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घ्या – न्या. बनसोडे
यावेळी न्यायाधीश पवन बनसोड पुढे म्हणाले की, समानतेचा अधिकार असला तरी दुसऱ्या व्यक्तीशी संभाषण करताना शब्दाचा योग्य पद्धतीने वापर करणे महत्त्वाचे आहे. अन्यथा वाद निर्माण होऊन तो टोकास गेल्यास न्यायालयापर्यंत येतो. न्यायालयामध्ये सद्यस्थितीत कौटुंबिक कलहाच्या अनेक केसेस दाखल होतात. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने कुटुंबातील इतर व्यक्तींचा सन्मान करावा व कोणीही दुखावणार नाही तसेच वाद निर्माण होणार नाही, याची काळजी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने घेणे काळाची गरज झाली आहे. संविधानामुळे मिळालेल्या अधिकारांचा वापर करताना कर्तव्याचा विसर पडू नये. पर्यावरणाचा होणाऱ्या -हासाचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. त्यामुळे स्वतःकडून कोणतीही पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी प्रत्येक व्यक्तीने घेण्याचे आवाहन न्यायाधीश बनसोडे यांनी केले.

निवडणूकीबाबत मार्गदर्शन
अॅड.व्ही.ए.पवार यांनी ग्रामपंचायत निवडणूक कायद्याविषयी माहिती दिली. तिसरे अपत्य असणे, अतिक्रमण धारक असणे, वैयक्तिक स्वच्छतागृह नसणे, या कारणांवरून संबंधित उमेदवाराला निवडणूक लढवायला प्रतिबंध करण्यात येतो. अॅड.बी.झेड. मराठे यांनी महिला विषयक कायदे विषयी माहिती दिली. हुंडाबळी, गर्भलिंग निदान, यासारख्या घटनांबाबत कायदा असून याची अंमलबजावणी अधिक तीव्रतेने करण्यात येत आहे. महिलांबाबत शासनाने अनेक कायदे केले असून महिलांचे होणारे समाजातील शोषण थांबावे हा त्या कायद्यांचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्राहक संरक्षण कायद्यांची दिली माहिती
ग्राहक संरक्षण कायद्याविषयी प्रा.सी.डी. डागा यांनी माहिती दिली. सरकारी वकील अॅड.महेश पाडवी म्हणाले की, संविधानामुळे समानतेचा, स्वातंत्र्याचा, धर्मनिरपेक्षतेचा, अस्पृश्यता निवारण, व नव्याने शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे. आपल्या अधिकाराचा वापर करताना दुसऱ्याच्या अधिकारावर गदा येणार नाही याची काळजी प्रत्येक व्यक्तीने घ्यावी. दुसऱ्याच्या सन्मान देखील केला पाहिजे हेच संविधान शिकवते. याप्रसंगी शिंदखेडा आगाराचे सहाय्यक आगारप्रमुख डी.एन.मोनकर यांनी परिवहन महामंडळाच्या विविध योजनांविषयी माहिती देऊन या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

मेळाव्यात अकरा स्टॉल सहभागी
या मेळाव्यात एकूण अकरा स्टॉल लावण्यात आले होते. यात संजय गांधी निराधार योजना, राज्य परिवहन विभाग, महिला बालकल्याण, विभाग तालुका विधी सेवा समिती, आरोग्य विभाग, कृषी विभाग, व सेतु कार्यालयाचे स्टॉल, सुधारित कापूस पद्धती, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, अटल पेन्शन योजना, स्वच्छ भारत मिशन, व गांडूळ खत तयार करणे विषयी निसर्ग रत्न गायत्री फार्म यांच्या स्टॉलचा समावेश होता. प्रत्येक स्टॉल वर असलेल्या प्रतिनिधींनी संबंधित विभागाची माहिती सविस्तरपणे लोकांना दिली. या कायदे विषयक साक्षरता शिबिर व महामेळाव्याचे आयोजन अॅड.व्हि.एल.पाटील यांनी केले.