दिव्यांग मुलांच्या राज्यस्तरीय स्पर्धेत श्रवण विकास मंदिरचे यश

0

सावखेडा बु.॥ येथील विवेकानंद प्रतिष्ठान संचालित, श्रवण विकास मंदीर या कर्णबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुणे येथे बाल कल्याण संस्था आयोजित राज्यस्तरीय कॉम्प्युटर स्किल,टाकाऊतून टिकाऊ या दिव्यांग मुलांच्या स्पर्धेत यश संपादन केले. याचाच एक भाग म्हणून यंदा राज्य पातळीवर दिव्यांगांच्या कर्णबधीर, मतीमंद, अस्थीव्यंग, गतीमंद, स्वमग्न, अंशत: अंध, अंध या प्रवर्गनिहाय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातून 30 अपंग विद्यालयातील 150 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

पुणे येथे घेण्यात आली स्पर्धा
अपंग बालकांसाठी मनोरंजन व सांस्कृतिक केंद्राचे कार्य करीत असलेल्या बाल कल्याण ही संस्था, पुणे येथे अपंगांच्या विविध प्रवर्गनिहाय शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी वर्षभर विविध शिबिरे, अभ्यासमाला, प्रशिक्षण व स्पर्धांचे आयोजन करीत असते. यानुसार दिव्यांगांच्या स्पर्धांचे राज्यस्तरावर आयोजन करण्यात आले होते. श्रवण विकास मंदीर या कर्णबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग घेवून विजेतपद पटकविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

गौरी इंगळे प्रथम
जळगाव जिल्ह्यातून श्रवण विकास मंदीर या कर्णबधीर विद्यालयातील 5 मुलांनी मातीकाम, कॉम्प्युटर स्किल, वेस्ट रि युज या स्पर्धामध्ये सहभाग घेतला.त्यामध्ये कॉम्प्युटर टायपिंग स्पर्धेत कु. गौरी सुधाकर इंगळे (इ. 6 वी) हिस प्रथम पारितोषिक व टाकाऊतून टिकाऊ स्पर्धेत कु. पूनम अनिल अहिरे (इ. 5वी) व चि. बुध्दभुषण जीवन गवळे (इ.4 थी) यांनी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकविले

यांनी केले अभिनंदन
यशस्वी विद्यार्थ्यांचे विवेकानंद प्रतिष्ठान संस्थेतर्फे अध्यक्षा शोभा पाटील, पूनम मानुधने, मुख्याध्यापक पद्माकर इंगळे , वाहन विभाग प्रमुख मिलिंद पुराणिक व शिक्षकांनी कौतुक व अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक पद्माकर इंगळे यांचे प्रोत्साहन व कला शिक्षिका अश्विनी कुलकर्णी, गिरीश बडगुजर, नीता ढाके, मच्छिंद्र भोई व विशेष शिक्षिका विद्या वैदय, जयश्री चिरमाडे यांनी मार्गदर्शन केले.