कर्णधार मशरफे मुर्तजा पराभवानंतर जमिनीवर; काही चुका झाल्याच

0

दुबई : ‘आम्ही आशिया चषक जिंकलोय’ असं अंतिम सामन्याआधीच म्हणणारा बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार मशरफे मुर्तजा हा संघाच्या पराभवानंतर जमिनीवर आला आहे. ‘आम्ही मनापासून खेळलो, पण काही चुका झाल्याच,’ अशी कबुली मुर्तजा यानं आता दिली आहे.

शेवटच्या चेंडूपर्यंत उत्कंठावर्धक झालेल्या भारत – बांगलादेश सामन्यात भारतानं काल बांगलादेशचा पराभव करत सातव्यांदा आशिया चषक पटकावला. यावेळी आशिया चषक जिंकणारच असा आत्मविश्वास बाळगणाऱ्या बांगलादेशला या निसटत्या पराभवामुळं मोठा धक्का बसला. कर्णधार मुर्तजानं हे मान्य केलं. ‘आम्ही मनापासून खेळलो. पण फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये आमच्याकडून काही चुका झाल्या. त्याचा फटका आम्हाला बसला. आम्हाला आमच्या गोलंदाजीबद्दल एक अंदाज आलाय. आतापर्यंत जेव्हा-केव्हा आम्ही २४०च्या वर धावा काढल्या आहेत, तेव्हा आम्ही सामना जिंकलोय. त्यामुळं जास्तीत जास्त धावा हेच आमचं लक्ष्य होतं. तसं फलंदाजांना सांगितलं होतं. मात्र, सर्व गोष्टी जुळून आल्या नाहीत,’ असं मुर्तजा म्हणाला.

‘आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मात्र, भारतीय फलंदाज प्रत्येक चेंडूवर धावा घेत होते. त्यामुळं फिरकी गोलंदाजांना आणणं शक्य नव्हतं. ४९व्या षटकात मुस्तफिजूर रेहमानला गोलंदाजी द्यायला हवी होती,’ असंही तो म्हणाला. ‘बांगलादेशच्या संघाला आपल्या कामगिरीचा अभिमान वाटला पाहिजे. आता आणखी मोठी झेप घेण्याची वेळ आली आहे,’ असंही मुर्तजाने सांगितलं.

Copy