Private Advt

कर्ज विवंचनेत शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या

बोदवड : दोन महिन्यांपूर्वीच पत्नीचा कोरोनामुळे झालेला मृत्यू व उपचारासाठी काढलेले कर्ज डोईजड झाल्याने कर्ज विवचंनेत तालुक्यातील पळासखेडे येथील शेतकर्‍याने गळफास घेत जीवनयात्रा संपवली. तालुक्यातील पळासखेडे येथे सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. संजय माणिक चव्हाण (50) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात आली. मयत संजय चव्हाण या शेतकर्‍याच्या पत्नीचे कोरोनामुळे 23 मे रोजी निधन झाले होते. पत्नीच्या उपचारासाठी त्यांनी बिग शेती पतसंस्थेचे कर्ज काढले होते शिवाय शेतीसाठीदेखील सोसायटीचे कर्ज काढल्याने पाच लाख रुपयांचा कर्ज डोंगर उभा झाल्याने शेतकरी खचले होते. कर्ज कसे फेडावे या विवंचनेत सोमवारी सकाळी त्यांनी गळफास घेतला. मयत शेतकर्‍याच्या पश्‍चात मुलगा व विवाहित मुलगी आहे.