कर्ज मंजूरीच्या आमिषाने थेरगावात तिघांना गंडा

0
दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल
पिंपरी-चिंचवड : कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवून तिघांकडून पैसे आणि महत्वाची कागदपत्रे घेतली. मात्र कर्ज मंजूर करून दिले नाही. हा प्रकार 8 मार्च ते 24 सप्टेंबर दरम्यान थेरगाव येथे घडला. विद्या बन्सी राजगुरू (वय 27, रा. श्रीकृष्ण कॉलनी, थेरगाव. मूळ रा. मोहरीता, पाथर्डी, जि. अहमदनगर) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार निशिकांत दहीवडे (रा. थेरगाव), रोहन मोरे (रा. कोथरूड) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
उकळले बारा हजार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्या त्यांची बहीण जयश्री कपिल कापुरे (वय 31, रा. लोंढे वस्ती, थेरगाव) आणि त्यांच्या ओळखीचे विशाल चंद्रवंशी (रा. भोसरी) या तिघांना कर्ज हवे होते. त्यांना ते कर्ज मंजूर करून देण्याचे आरोपींची अमिष दाखवले. कर्ज मंजूर करण्यासाठी प्रोसेसिंग फी म्हणून प्रत्येकी चार हजार रुपये लागणार असल्याचे सांगितले. तिघांनी आरोपींना प्रत्येकी चार हजार प्रमाणे एकूण 12 हजार रुपये दिले. त्याचबरोबर आरोपींनी कर्ज मंजूर करण्यासाठी म्हणून तिघांचे आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट साईज फोटो अशी कागदपत्रे घेतली. त्यानंतर आरोपींशी कोणताही संपर्क झाला नाही, त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच विद्या यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी भोगम तपास करीत आहेत.
Copy