कर्जमाफी आणि तूरप्रश्नी शेतकऱ्यांचे मंत्रालयाबाहेर आंदोलन

0

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करावी आणि शेजारील कर्नाटक राज्याच्या धर्तीवर तूर उत्पादक शेतकऱ्यांना बोनस मिळावा या मागणीवरून बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने मंत्रालयाच्या दारातच राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत तूर दाळ, कांदा आणि केळीचे घड उधळले.

शेतकऱ्यांनी केलेल्या या अचानक आंदोलनामुळे मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत सर्व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.

दुपारी मंत्रालयात येण्यासाठी प्रवेशद्वारावर गर्दी झालेली असताना अचानक 50 ते 100 लोकांनी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर येत राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. तूर डाळीचे पोते आणून प्रवेशद्वारावर ओतले. त्याचबरोबर कांदा फेकत केळीचे घड उधळले. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत शेती मालाला योग्य हमी भाव मिळाला पाहिजे, अशी मागणी केली. बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील घाटणेकर, संस्थापक पंजाबराव पाटील आणि बी.जी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

राज्यातील शेती मालाला शेतकऱ्यांचे कर्ज माफ करुन त्यांचा सातबारा कोरा करावा ही संघटनेची प्रमुख मागणी असून तसेच राज्यातील शिल्लक तूर खरेदी करुन कर्नाटक राज्याप्रमाणे तुरीला प्रति टन ४५० रूपये बोनस द्यावा अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेने केली आहे. त्याचबरोबर राज्यात तूर खरेदीत झालेल्या घोटाळ्याची सीआयडीमार्फत चौकशी करावी आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी तत्काळ लागू कराव्यात या मागणीसह शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव द्यावा, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन तत्काळ भरपाई द्यावी आदी मागण्याही संघटनेच्या वतीने यावेळी करण्यात आल्या.