Private Advt

कर्जबाजारी शेतकर्‍याची गळफास घेत आत्महत्या

चाळीसगाव : कर्जबाजारीपणास तसेच अति पावसामुळे जमीन नापिकी झाल्याने चाळीसगाव तालुक्यातील गणेशपूरच्या शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुकलाल संतोष पाटील (वय 35) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे.

शेतकर्‍यापुढे अस्मानी-सुलतानी संकट
गेल्या दोन-तीन वर्षांपासून पावसामुळे पीक वाया जात असल्यामुळे सुकलाल पाटील वैतागून गेले होते. चतुर्भज शिवारात आईच्या नावे दोन एकर शेती आहे. आईचा सांभाळ तेच करत. एकमेव कर्ता पुरुष म्हणून त्यांच्यावरच जबाबदारी होती. यावर्षी कपाशीचे पीक अतिवृष्टीमुळे वाया गेल्याने सोसायटी व शेतीसाहित्याचे कर्ज तसेच खाजगी सावकारी व हात उसनवार कर्जही कायम राहिल्याने कर्जाचा डोंगर वाढत गेल्याने ते वैफल्यग्रस्त झाले होते. सोमवारी ते सकाळी शेतात गेले ते रात्री 8 वाजेपर्यंत घरी आले नाही. शोध घेतला असता शेतातील झाडालाच गळफास घेतल्याचे आढळले. त्यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा व वृद्ध आई असा परीवार आहे.