करोनामुळे आर्थिक संकट, पण भारतामध्ये परिस्थिती सध्यातरी नियंत्रणात

0

नवी दिल्ली – कोरोनामुळे आर्थिक अर्थव्यवस्थेला मंदीचे ग्रहण लागले आहे. मात्र पुढील वर्षी ही स्थिती सुधारेल. भारतासमोर परकीय चलनातील देवाणघेवाणीचे मोठे आव्हान आहे. इतर देशांच्या तुलनेत आपल्या चलनाची स्थिती चांगली आहे. याचे श्रेय रिझर्व्ह बँकेला जाते आणि यात दुमत असण्याचे कारण नाही. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरले आहे. मात्र इतर देशांच्या तुलनेत ही घसरण कमी आहे, असे मत रिझर्व्ह बँकेचे माजी अध्यक्ष रघुराम राजन यांनी व्यक्त केले.

कोरोनामुळे अडचणीत आलेल्या सापडलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि शिकागो विद्यापीठाचे प्राध्यापक रघुराम राजन यांचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सल्लागार समितीत समावेश करण्यात आला आहे. राजन यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना भारतीय अर्थव्यवस्था आणि कोरोनाच्या संकटावर भाष्य केले. सध्याच्या घडीला संपूर्ण जग हे आर्थिक मंदीच्या दिशेने झुकत चाललेले आहे. पुढील वर्षात मला आशा आहे की ही परिस्थिती सुधारलेली असेल. मात्र सध्या करोनाविरुद्ध लढण्यासाठी आपण काय पावले उचलत आहोत, त्यावर हे अवलंबून असणार आहे. भारतासाठी परकीय चलन हा नेहमी चिंतेचा विषय राहिलेला आहे. सध्या इतर विनकसनशील देशांच्या तुलनेत आपली परिस्थिती ही चांगली आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण हा देखील एक चिंतेचा विषय आहेच, मात्र ब्राझील सारख्या देशात सध्याची असलेली परिस्थिती पाहता भारतामध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे. अशा परिस्थितीत सरकारने त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यायला हवा मग ते विरोधी पक्षातलेही का असेना! याचसोबत सध्याच्या परिस्थितीत सरकारने आपल्याला मदत मागितली तर आपण तयार असल्याचेही राजन यांनी स्पष्ट केले.

एक भारतीय म्हणून उत्तर…

भारतात कोरोनाच्या संकटाची तीव्रता वाढत असून अर्थव्यवस्थाही अडचणीत आहे. अशा परिस्थितीवर भारताची मदत कराल का, असा प्रश्न राजन यांना विचारण्यात आला. त्यावर मदतीचे आवाहन केल्यास मी नक्कीच योगदान देईन, असे उत्तर त्यांनी दिले. ही परिस्थिती बिकट आहे. मी एक भारतीय नागरिक आहे. कोणत्याही भारतीयाला कठीण काळात मदतीसाठी बोलावले जाते, तेव्हा तो येणारच, असे राजन पुढे म्हणाले.

Copy