करंजी पाचदेवळीच्या गरोदर विवाहितेची आत्महत्या

0

कॅमेर्‍यासाठी पैसे न दिल्याने सासरच्यांनी गळफास देवून मारल्याचा आईचा आरोप ;

भुसावळ- बोदवड तालुक्यातील करंजी पाचदेवळी येथील प्रियंका गोपाळ पाटील (20) या विवाहितेने गुरूवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही मात्र कॅमेरा घेण्यासाठी माहेरून पैसे न आणल्यानी आपल्या मुलीचा खून करण्यात आल्याचा आरोप मयत मुलीच्या आईने केला आहे. वरणगाव पोलिसात त्या तक्रार दाखल करण्यासाठी आल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारार्थ हलवण्यात आले तर शनिवारी त्या वरणगाव पोलिसात आल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मयत विवाहिता ही गरोदर असल्याचे शवविच्छेदनात आढळले आहे.

आईशी बोलल्यानंतर 15 मिनिटात आत्महत्या
बोदवड येथील माहेर व करंजी पाचदेवळी येथील सासर असलेल्या प्रियंकाचा अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच गोपाळ पाटील या तरुणाशी विवाह झाला होता मात्र कॅमेरा घेण्यासाठी विवाहितेने माहेरून पैसे आणावेत म्हणून तिचा छळ सुरू होता, असा आरोप मयताच्या आईने शुक्रवारी सकाळी वरणगाव पोलिस ठाण्यात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केला. गुरुवारी रात्री 9.15 वाजता मुलगी प्रियंकाशी मोबाईलवर बोलणे झाले व अवघ्या 15 मिनिटात मुलीने आत्महत्या केल्याचा निरोप आला, असे मयताच्या आईने सांगत आपण येईपर्यंत सासरच्यांनी मृतदेह रुग्णालयात हलवल्याचे सांगून या प्रकारात घातपात झाल्याचा आरोपही केला. विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी करंजी पाचदेवळीचे पोलिस पाटील पुरूषोत्तम जानकीराम पाटील यांनी वरणगाव पोलिसात खबर दिल्यावरून सुरूवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत विवाहितेच्या पश्‍चात आई व लहान बहिण असा परीवार आहे.

Copy