कबड्डीसारख्या देशी खेळांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार व्हावा

0

नवी दिल्ली : कबड्डी आपल्या देशाचा प्राचीन आणि लोकप्रिय खेळ आहे. कबड्डीसारख्या देशी खेळांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसार होण्यावर जोर देताना युवकांनीही हे खेळ खेळावेत, असे आवाहन केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी केले. क्रीडामंत्र्यांनी सोनिपत येथे पहिल्या अखिल भारतीय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन केले. या स्पर्धेचा मुख्य उद्देश कबड्डी हा खेळ युवकांत आवडावा आणि देशी खेळांचा प्रसार करणे, हा आहे. हरियाणाचे क्रीडामंत्री अनिल विज हेदेखील या प्रसंगी उपस्थित होते. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा ११ फेब्रुवारीपर्यंत चालेल. त्यात विजेत्या संघाला एक कोटी रुपये, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहणाऱ्या संघांना अनुक्रमे ५० लाख व २५ लाख रुपये ही बक्षीस रक्कम प्रदान केली जाईल.

दर्जा उंचवावा लागेल

गोयल यावेळी म्हणाले, अहमदाबाद येथे भारताने नुकताच कबड्डी वर्ल्डकप जिंकला. भारताने या खेळाला जागतिक पातळीवर लोकप्रिय बनवले आहे. आपल्या मते, देशी खेळांविषयी युवकांत आवड निर्माण व्हायला हवी. याचे आयोजनदेखील कमी खर्चात केले जाऊ शकते. आपल्याला याचा दर्जा उंचवावा लागेल. क्रीडा मंत्रालयातर्फे खेलो इंडिया योजनेअंतर्गत लवकरच ग्रामीण खेळ महाकुंभाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण खेळांना प्रोत्साहन मिळेल आणि प्रतिभावान युवा खेळाडू शोधले जाऊ शकतील, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राचा सहभाग नाही

अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेसाठी संघ न पाठवण्याचा निर्णय महाराष्ट्राने घेतला. स्पर्धेत राज्यातील तीन व्यावसायिक संघ; तसेच चांगले संघ नसल्यामुळे संघ न पाठवण्याचे महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने ठरवले. सुरवातीस निश्‍चित केलेल्या गटवारीत महाराष्ट्र ‘क’ गटात राजस्थान व एअर इंडियासह होता. मात्र, आपल्या संघातील खेळाडू व्यावसायिक संघातून खेळणार हे लक्षात आल्यावर संघ न पाठवण्याचे ठरले. महाराष्ट्राऐवजी उत्तर प्रदेशला स्थान मिळाले. या स्पर्धेत भारत पेट्रोलियम, एअर इंडिया, महिंद्र हे मुंबईतील स्थानिक स्पर्धांमध्ये खेळणारे संघ आहेत. त्याचबरोबर मुंबईतील निमंत्रित संघांत कायम असणारा ओएनजीसी हा संघही आहे. या परिस्थितीत राज्याच्या संघासाठी कोणी खेळाडूच शिल्लक राहिले नव्हते.