कचरा प्रश्‍नी सत्ताधारी पक्ष एकाकीः खासदार सुळे यांनी आणले जेरीस

0

पुणे (राजेंद्र पंढरपुरे) : शहरातील कचरा प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षाला अगदी जेरीस आणले आहे. या प्रश्‍नावर एकाकी पडलेल्या भाजपचा एकही नेता हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी पुढे येत नसल्याने याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही एकाकी खिंड लढवणार कोण, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

गेल्या महिनाभरात भाजपच्या दृष्टीने अनेक प्रतिकूल घटना घडल्या. त्याही बाबत भाजप एकसंधपणे वागताना दिसलेलाच नाही. महापौर मुक्ता टिळक यांच्या आरक्षणासंदर्भातील विधानावरून वादंग झाले. भाजपच्या दोन गटांत महापालिका भवनात हाणामारी झाली. खंडणीप्रकरणी भाजप पदाधिकार्‍याला ताब्यात घेण्यात आले आणि गेले तीन आठवडे शहरातील कचरा समस्या उग्र बनली आहे. अशावेळी पालक मंत्री गिरीष बापट आणि महापौर टिळक परदेशी गेले आहेत. त्यामुळे लोकांच्या असंतोषात अधिकच भर पडली आहे.

पुढे कोण येणार?
पुण्यात भाजपचे तीन खासदार, आठ आमदार आणि 98 नगरसेवक आहेत. शहरावर भाजपचे असलेले वर्चस्व त्यातून दिसून येते. मात्र, कचर्‍यासारख्या ज्वलंत प्रश्नावर पुणेकरांसमोर यायलाच पक्षाचे कोणी तयार नाही, असे विपरित चित्र पुढे येत आहे. यावर भाजप आपली खंबीर भूमिका मांडत नसल्याचीच भावना दृढ होते आहे.

हा आकडा काढला कोठून?
महापालिकेत भाजपने मोडतोड केली. त्याची भरपाई देऊ, असे आश्वासन महापौर टिळक यांनी दिले. त्यादृष्टीने पुढे काही घडले नाही. पक्षसंघटनेतर्फे भरपाईसाठी काही झाले नाही. एका पदाधिकार्‍याने 51 हजारांचा धनादेश दिला. नुकसान किती झाले, याचा तपशील अजून जाहीर झालेला नाही. मग हा 51 हजारांचा आकडा कोणी आणि कोठून काढला, हेही महापौरांनी स्पष्ट केले नाही. खुद्द महापौरांच्या एका विधानावरून प्रतिक्रिया उमटतच राहताहेत. त्यावरही भाजपकडून स्पष्टीकरण दिले गेलेले नाही.

राष्ट्रवादीला आय्ते कोलीत
शहरातील कचर्‍याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न चुटकीसरशी सुटणारा नाही, याची जाणीव बहुदा सर्व पक्षांच्या नेत्यांना आहे. त्यातही भाजप नेत्यांच्या वर्तणुकीने असंतोष वाढला आहे. मुख्यमंत्र्यांनी कचरा डेपोचा प्रश्न नऊ महिन्यांत सोडविण्याचे आश्वासन दिले होते. अलिकडेच त्यांनी याबाबत हात झटकले. शिवाय जबाबदारी बापट यांच्यावर टाकली. बापटांपुढे एक समस्याच उभी राहिली आणि दरम्यान ते परदेश दौर्‍यावर गेले. पाठोपाठ महापौरही परदेश दौर्‍यावर गेल्या. कचरा प्रश्न चिघळायला आणि हे दौरे घडायला एकच वेळ जुळून आली आणि या सर्वांतून राष्ट्रवादीला आयते कोलीत मिळाले. पक्षाच्या खासदार सुळे यांनी भाजपला जेरीस आणले.

पुढाकार घेणार कोण?
भाजपमध्ये 40 नगरसेवक राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून आलेले आहेत. त्यातील राष्ट्रवादीवाल्यांच्या मनात शरद पवारांविषयी आजही आदर आहे. त्यामुळे ते सुप्रिया सुळेंविरोधात टोकाला कदापि जाणार नाहीत. शिवसेना आणि भाजप संबंध तणावाचे आहेत. हा पक्ष अलिप्त राहील. रिपब्लिकन पक्ष त्यांच्या अंतर्गत प्रश्नातून नुकताच बाहेर येतो आहे. अशा राजकीय स्थितीत भाजपला खिंड एकाकीच लढवावी लागणार आहे. पण ती लढवायची कोणी, हा कळीचा प्रश्न होऊन बसला आहे.