कचरा डेपो बंद न झाल्यास राजीनामा

0

पुणे : उरुळी देवाची आणि फुरूसुंगी येथील कचरा डेपो बंद न झाल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असा इशारा शिवसेनेचे स्थानिक आमदार आणि जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी शनिवारी दिला. दरम्यान, कचरा डेपो बंद करण्याच्या मागणीवर ग्रामस्थ ठाम असून, त्यांनी तोंडाला काळी पट्टी बांधून मूक आंदोलन सुरू केले आहे.

पुण्याचा कचरा प्रश्न गंभीर बनला आहे. उरूळी देवाची आणि फुरुसुंगीतील कचरा डेपोत गेल्या 21 दिवसांपासून पुण्यातील कचरा टाकू दिला जात नाही. ग्रामस्थांनी त्यास कडाडून विरोध केला आहे. कचरा डेपो बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. ही कचराकोंडी फोडण्यासाठी स्थानिक आमदार आणि राज्यमंत्री शिवतारे यांनी शनिवारी सकाळी ग्रामस्थांची भेट घेतली. त्यावेळी कचरा डेपो बंद करण्याच्या मागणीवरून ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यावर उरुळी देवाची आणि फुरूसुंगीचा कचरा डेपो कायमस्वरुपी बंद न झाल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असा इशारा शिवतारे यांनी दिला.

कृती आराखडा तयार करा
कचरा प्रश्नावर पुणे महापालिका प्रशासनाने 15 दिवसांचा कृी आराखडा तयार करावा, असे आदेशही त्यांनी दिले. शहरातील कचरा शहरातच जिरवण्यासाठी पुण्यातील प्रत्येक नगरसेवकाने छोट्या कचरा प्रकल्पांची निर्मिती करावी, असे आवाहनही शिवतारे यांनी केले. यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस व शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे नगरसेवकांना सूचना करतील, असेही त्यांनी सांगितले.

गंभीर प्रश्‍नावर राजकारण नको
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही शिवतारे यांनी अप्रत्यक्षपणे टीका केली. कचरा डेपोच्या ठिकाणी तसेच पुण्यातील आंदोलनात काही जण सहभागी होत आहेत. या प्रश्नावरून राजकारण केले जात आहे. हा गंभीर प्रश्न असून, कुणीही राजकारण करता कामा नये, असा टोला शिवतारे यांनी लगावला.

चर्चा फक्त मुख्यमंत्र्यांशीच
कचरा डेपो बंद करण्याच्या मागणीवर ग्रामस्थ ठाम असून, या मागणीसाठी त्यांनी शनिवारपासून तोंडाला काळी पट्टी बांधून मूक आंदोलन सुरू केले. या प्रश्‍नावर आता फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीच चर्चा केली जाईल, अशी भूमिकाही ग्रामस्थांनी घेतली आहे. त्यामुळे राज्य सरकार व मुख्यमंत्री याबाबत कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शहरात 22 हजार टन कचरा पडून?
शहरात रोज सुमारे 1700 टन कचरा उचलला जातो. त्यांपैकी सुमारे 500 टन कचर्‍यावर पालिका प्रत्किया करते. उरलेला 1200 टन कचरा उरुळी देवाची व फुरसुंगीतील कचरा डेपोत रोज टाकला जातो. गेले 19 दिवस शहरातील कचरा उचलला न गेल्याने शहरात सुमारे 22 हजार टन कचरा पडला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.