कचराकुंड्या खरेदीवरुन विरोधक,आक्रमक

0

भुसावळ। भुसावळ शहराचा देशभरात अस्वच्छतेच्या बाबतीत दुसरा क्रमांक आल्यामुळे पालिकेवर नामुष्की ओढविली आहे. त्यामुळे आता डॅमेज कंट्रोलसाठी पालिकेतील सत्ताधारी खडबडून जागे झाले आहे. शहरात स्वच्छतेसाठी शुक्रवार 12 रोजी विशेष सभा घेण्यात आली. या सभेत एकूण 19 विषय घेण्यात आले. त्यात 100 कचरा कुंड्या व घंटागाड्या खरेदी करण्याच्या निवीदेवर विरोधी नगरसेवक संतोष चौधरी (दाढी) यांनी हरकत घेऊन आलेल्या निवीदांची माहिती देण्याचा अट्टहास केला. तसेच इतक्या दिवसात आत्ताच खरेदी का करण्यात येत आहे. याअगोदर शहराचा अस्वच्छतेत क्रमांक येण्याची वाट पाहत होते का? असा प्रश्‍न उपस्थित करताच या वादात उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, गटनेता उल्हास पगारे यांसह इतरही नगरसेवक पडल्याने शाब्दिक चकमक उडाली.

मंजुरी मिळाली मात्र, अंमलबजावणी होणे गरजेची
सभेत किरकोळ वाद वगळता विरोधकांनी देखील शहराच्या स्वच्छतेसाठी या सर्व विषयांना मंजुरी दिली. स्वच्छ भारत अभियानात भुसावळ शहराला 433 वा क्रमांक मिळाला. यानंतर शहराची प्रतिमा मलिन झाल्यामुळे विरोधकांनी यावर सत्ताधार्‍यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करुन जोरदार निषेध प्रदर्शन करण्यात आले होते. त्यामुळे सत्ताधार्‍यांनी स्वच्छतेसाठी 19 विषय घेतले खरे मात्र या विषयांची अंमलबजावणी कितपत होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

जाहिरातीद्वारे एजन्सी द्यावी
विषय 1 ते 5 मध्ये कचरा गोळा करणे, 14 व्या वित्त आयोगाअंतगर्त घनकचर्‍यावर प्रक्रिया करणे, मोठ्या गटारी तळापर्यंत साफ करुन निघालेला गाळ वाहतुक करणे, मनिशद्वारे नालेसफाई करणे, डंपिंग ग्राऊंड जेसीबीद्वारे लेव्हलिंग करणे या संदर्भात विविध कामांच्या एजन्सी नेमणे बाबत विचार करणे हे विषय मांडण्यात आले असता जनाधार पार्टीचे गटनेता उल्हास पगारे यांनी यास लेखी हरकत नोंदविली. व या सर्व विषयांच्या एजन्सीस देण्यासंदर्भात अगोदर जाहीरात प्रकाशित करुनच त्यांना मंजुरी देण्यात यावी अशी मागणी केली. यावर नगराध्यक्ष रमण भोळे यांनी हि कामे शासकीय
नियमानुसारच तसेच पारदर्शकरित्या होतील असे स्पष्ट केले.

सभेत या विषयांना मिळाली मंजुरी
मंजुर करण्यात आलेल्या विषयांमध्ये 14 व्या वित्त आयोगाअंतर्गत शहरातील घरो घरी जाऊन कचरा गोळा करणे, रस्ते आणि गटार यातील कचरा उचलणे, घनकचर्‍यावर प्रक्रिया करणे, मोठ्या गटारी तळापर्यंत साफ करुन त्यातील गाळ वाहतुक करण्यासाठी एजन्सी नेमणे, नालेसफाई करणे, खेडी रोड वरील डंपिंग ग्राऊंड व महामार्गालगत टाकलेल्या कचर्‍याचे ढिग जेसीबीद्वारे लेव्हलिंग करणे, शौचालय साफ करण्यासाठी दोन 5 एचपी डिझेल मशिन ट्रक्टर टँकरवर बसविणे, नादुरुस्त व्हॅक्युम एम्टीअर दुरुस्त करणे, 1 नविन हॅक्युम एम्टीअर खरेदी करणे, घनकचरा व्यवस्थापनासाठी 100 लोखंडी कचराकुंड्या, थ्री व्हिलर घंटागाड्या खरेदी करणे, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेचे सर्व्हेक्षण करण्यासाठी व प्रस्ताव तयार करणे, पथदिवे दुरुस्ती, 3 मोबाईल टॉयलेट खरेदी, घंटागाडी वाहनांवर कराराने चालक नेमणे, रस्ते व नाल्यांवरील अतिक्रमण काढणे, तयार मुतारी व शौचालय खरेदी करणे, सफाई कामगारांना गणवेश, गम बुट, रेनकोट खरेदी करणे, पालिकेत स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष स्थापन करणे या विषयांचा समावेश आहे.

एकत्र येऊन काम करावे
याप्रसंगी शासनाच्या स्वच्छता अभियानाच्या निकालावर बोलताना नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले की, केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयामार्फत जानेवारी 2017 मध्ये सर्वेक्षण करण्यात आले. यात 434 शहरांपैकी भुसावळ शहराचा 433 वा क्रमांक मिळाला. यात विशेष जोर हा सफाई कामगारांवर देण्यात आला होता पालिकेत अगोदर पासून सफाई कामगारांची कमतरता आहे. त्यामुळे आताही फक्त 42 टक्केच सफाई कामगार आहेत. तसेच घंटागाड्या नसल्यामुळे कचरा संकलाची व्यवस्थाच नाही. मात्र आता यासाठी विशेष नियोजन केले जात आहे. शासनाचा जो निकाल आला तो योग्यच होता, त्यामुळे आता शहराला लागलेला कलंक पुसण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन नगराध्यक्ष भोळे यांनी केले.