औरंगाबादमध्ये १६ मजूरांचा मालगाडीखाली चिरडून मृत्यू

1

औरंगाबाद – रेल्वे रुळावरुन गावाकडे पायी जाणार्‍या १६ मजूरांचा रेल्वे मालगाडीखाली चिरडून मृत्यू झाला. शुक्रवारी पहाटेच औरंगाबादमध्ये ही मोठी भीषण दुर्घटना झाल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेत मरण पावलेले कामगार मध्यप्रदेशातील सादोल आणि उमरिया जिल्ह्यातील रहिवासी होते हे मजूर चंदनझिरा, जालना भागातील एसआरजे या स्टील कंपनीत कामाला होते.

मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यातील एका स्टील कंपनीत काम करणारे हे १९ मजूर गावी जाण्यासाठी पायी औरंगाबादकडे निघाले होते. औरंगाबाद येथून गावी जाण्यासाठी रेल्वे पकडणार होते. जालना ते औरंगाबाद रेल्वे रूळाहून पायी जाताना रात्री ते सर्वजण रुळावर झोपले होते. सर्वजण झोपेत असतानाच मालगाडी वरून गेल्यामुळे १४ जणांचा चिरडून मृत्यू झाला. तर पाच मजूर गंभीर जखमी झाले होते. जखमीपैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. लॉकडाउनमुळे सर्व प्रवासी रेल्वे वाहतूक बंद आहे. पण रेल्वेची मालवाहतूक काही प्रमाणात सुरू आहे. गुरुवारी रेल्वेने मध्यप्रदेशातील मजुरांसाठी भोपाळला एक गाडी रवाना केली. त्यामुळे आपल्यालाही एखाद्या अशाच गाडीने गावी जाता येईल, या आशेने जालन्याच्या एका स्टील कंपनीचे ते मजूर रातोरात औरंगाबादकडे पायी निघाले होते. पण प्रवासादरम्यान रात्र झाली म्हणून सर्वांनी रेल्वे रुळावरच झोपण्याचा निर्णय घेतला. मात्र ती रात्र त्या सवार्र्ंसाठी काळरात्र ठरली.

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख

औरंगाबाद येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे. या बरोबरच या अपघातातील जखमींवरील उपचाराची सर्व व्यवस्था केली जाईल, असेही मुख्यमंत्री चौहान यांनी म्हटले आहे. हे सर्व मजूर मध्य प्रदेशातील आहेत.

Copy