Private Advt

औरंगपूर येथे शिक्षण परिषदेत पृथ्वीराज राजपूत यांचा गौरव

चिरडे गावात शिक्षणाची ज्योत अखंड : दादाभाई पिंपळे

 

शहादा। पृथ्वीराज राजपूत हे मूळ सवाई मुकटी धुळे जिल्ह्यातील आहे. त्यांनी शहादा तालुक्यातील चिरडे गावातील नामशेष होणार्‍या शाळेला आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने द्विशिक्षकीवरून आठ शिक्षकी शाळा केली. गावातून होणारे स्थलांतर शंभर टक्के रोखून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्यामुळे चिरडे गावात शिक्षणाची ज्योत अखंड जळत असल्याचे प्रतिपादन दादाभाई पिंपळे यांनी केले. तालुक्यातील औरंगपूर येथे नुकतीच शिक्षण परिषद घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्र प्रमुख एस.एन.चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून इब्टाचे राज्य उपाध्यक्ष दादाभाई पिंपळे, किशोर मगरे होते. शिक्षण परिषदेत राज्यस्तरीय महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त पृथ्वीराज राजपूत यांचा केंद्राच्यावतीने गौरव करण्यात आला.

आकांक्षित जिल्ह्याला आदर्श शिक्षकांची गरज
बुडीगव्हाण गावाचा शैक्षणिक दृष्ट्या कायापालट करण्याची प्रतिज्ञा इब्टाचे शहादा तालुका महासचिव पृथ्वीराज राजपूत यांनी घेतली. त्यामुळे शिक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले. भविष्यात सरकारी शाळा टिकून रहाव्यात व प्राथमिक शाळेतील शिक्षणाचा दर्जा उंचावत रहावा यासाठी पृथ्वीराज राजपूत यांच्यासारख्या आदर्श शिक्षकांची गरज नंदुरबार सारख्या आकांक्षित जिल्ह्याला असल्याचे गौरवोद्गार केंद्र प्रमुख एस.एन. चौधरी यांनी काढले. शिक्षण परिषदेच्या सुरुवातीला देवडे यांनी संगीतमय वातावरण निर्माण करुन उत्साह निर्माण केला. प्रास्ताविक रघुनाथ बळसाणे यांनी केले. यशस्वीतेसाठी भाग मास्तर विशाल शिसोदे, शिवाजी संघाचे अमोल शिंदे, बाजीराव पाडवी, गणेश निकुंभ यांच्यासह औरंगपूर शाळेतील शिक्षकांनी परिश्रम घेतले.