ओल्या पार्टीत सहभागी अमळनेरातील कर्मचार्‍याची अधीक्षकांकडून चौकशी

0

चौकशीअंती अधिकारी कर्मचार्‍याबाबत होणार निर्णय : पोलिसांच्याच गृपवर झाले होते फोटो व्हायरल

जळगाव – अमळनेर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचार्‍याने एका बियरबार मालकासोबत ओली पार्टी केल्याचे छायाचित्र काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर व्हायरल झाले. विशेष म्हणजे अमळनेर शहरातील पोलिसांचा लॉकडाऊन नावाने असलेल्या गृपवरच हे फोटो व्हायरल झाल्याची माहिती आहे. दरम्यान या प्रकाराची पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्याकडून चौकशी सुरु झाली असून संबंधित छायाचित्र तपासून खात्री झाल्यानंतर संबंधित अधिकारी तसेच कर्मचार्‍याबाबत निर्णय होणार असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे.

लॉकडाऊनमध्ये घरात पार्टी रंगल्याची चर्चा ?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार असे की, एका घरात अमळनेर शहरातील बियरबारचा मालक त्याच्यासह तीन जण व पोलीस कर्मचारी याची पार्टी सुरु आहे. या पार्टीत मद्याची बाटलीही दिसून येत आहे. तर संबंधित बियरबारचा मालक सिगारेटच्या झुरके ओढतांना दिसत आहे. संबंधित पार्टी करतांनाचे छायाचित्र काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे. पोलीस कर्मचार्‍याच्या सहभागामुळे लॉकडाऊनच्या काळात एका घरात ही पार्टी रंगल्याची जोरदार चर्चा आहे.

आर.के.वाईन्सचे अमळनेर कनेक्शन

लॉकडाऊनच्या काळात आर.के.वाईन्सने मद्याची तस्करप्रकरण समोर आले होते. यात सहभाग निष्पन्न झाल्यानंतर पोलीस निरिक्षकांसह सह तीन कर्मचार्‍यांवर बडतर्फ चीही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान आर.के.वाईन्सचे अमळनेर कनेक्शन असल्याच्या संशयितावरुन राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे अमळनेरात वाईन शॉप, देशी दारुची दुकाने व परमीटरुम बियरबार, बियरशॉपी दुकानांमधील मद्याच्या साठ्याची तपासणी करण्यात आली होती. यावेळी येथील हॉटेल पायल व हॉटेल पूनम या हॉटेलातील मद्याच्या साठ्यात तफावत आढळून आल्याने संबंधित मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गुन्हे दाखल असलेल्या हॉटेलचा मालक पोलीस कर्मचार्‍यासोबतच्या ओली पार्टीत सहभागी असल्याचे दिसून येत आहे. संबंधित बियरबारचा मालक हा जळगावातील आर.के.वाईन्सचा मालक नोतवाणी यांचा शालक असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे.

लॉकडाऊनच्या काळात मद्यविक्री?

जळगावातील आर.के.वाईन्सने लॉकडाऊनच्या काळात ज्याप्रमाणे मद्याची तस्करी तसेच विक्री केली. त्याचप्रमाणे अमळनेरातही लॉकडाऊनच्या काळात पोलीस निरिक्षक तसेच पोलीस ठाण्यातील विशेष दबदबा असलेला पोलीस या दोघांच्या सहकार्याने मद्यविक्री झाल्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त होत आहे. लॉकडाऊनमध्ये विक्री झाल्यानेच संबंधित हॉटेलांच्या मद्यसाठ्यात तफावत झाल्याची माहिती आहे. मात्र ज्याप्रमाणे आर.के.वाईन्सचा परवाना रद्द झाला, त्याप्रमाणे संबंधित हॉटेलचा परवाना रद्द होण्याची शक्यता असून परवाना रद्द होवू नये यासाठी जोरदार राजकीय लॉबिंग सुुरु असल्याचेही वृत्त आहे.

एका पार्टीत पोलीस कर्मचारी सहभागी असल्या जे छायाचित्र व्हायरल झाले आहे. ते तपासले जात असून खात्री केली जात आहे. चौकशी सुरु आहे. चौकशीनंतर निर्णय घेवू. पार्टीत असलेला पोलीस कर्मचारी व अमळनेर पोलीस निरिक्षक यांच्या सहभागाने अमळनेरात लॉकडाऊनच्या काळात मद्यविक्री झाल्याबाबत पुरावे नाहीत? तुमच्याकडे पुरावे असतील तर द्या? त्यानंतर चौकशी करु

– डॉ. पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक

Copy