ओबीसी महिला बनणार जळगावच्या महापौर

0

मुंबई । राज्यातील २७ महानगरपालिकांच्या महापौर पदांची आरक्षण सोडत मंत्रालयात काढण्यात आली. आजच्या सोडतीमध्ये जळगाव महापालिकेचे महापौरपद हे ओबीसी महिलांसाठी राखीव निघाले आहे. परिणामी पुढील वर्षी होणार्‍या निवडणुकीत महिला महापौर विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र महानगरपालिका महापौर पदाचे आरक्षण, नियम २००६ आणि महाराष्ट्र महानगरपालिका (महापौर पदाचे आरक्षण) (सुधारणा), नियम 2011 नुसार राज्यातील २७ पैकी अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी- एक, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी- तीन (पैकी दोन पदे महिलांसाठी), नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी-सात (पैकी चार पदे महिलांसाठी) महापौर पदांचे आरक्षण आहेत. तर उर्वरित १६ (पैकी आठ पदे महिलांसाठी) महापौरपदे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती व नागरीकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी सोडत काढतांना या प्रवर्गासाठी सध्या आरक्षित असलेल्या व यापूर्वी आरक्षित असलेल्या महानगरपालिका वगळून उर्वरित महानगरपालिका विचारात घेण्यात आल्या आहेत. उर्वरित महानगरपालिकांच्या पदाची मुदत संपल्यानंतर हे आरक्षण लागू होईल.

यांची होती उपस्थिती
आज मंत्रालयात नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनीषा पाटणकर-म्हैसकर, नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर सुधाकर सोनवणे, मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर गिता जैन, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या हस्ते काढण्यात आली. यावेळी नगरविकास विभागचे उपसचिव गोखले, अवर सचिव मिलिंद कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

इच्छुकांच्या आशा पल्लवित
जळगाव महापालिकेची पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यात निवडणूक होणार आहे. यात महापौरपद हे ओबीसी महिलेसाठी राखीव निघाल्यामुळे इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. यामुळे आरक्षणाचे वृत्त येताच अनेक इच्छुकांनी आनंदोत्सव साजरा केला आहे. सामाजिक समीकरणांचा विचार करता या आरक्षणामुळे लेवा पाटीदार समाजातील महिलेस यासाठी संधी मिळू शकते.

मनपाचे प्रवर्गनिहाय महापौर पदाचे आरक्षण खालीलप्रमाणे
अनुसूचित जमाती प्रवर्ग – नाशिक महानगरपालिका, अनुसूचित जाती प्रवर्ग – अमरावती मनपा, अनुसूचित जाती प्रवर्ग (महिला) – नांदेड-वाघाळा मनपा आणि पनवेल मनपा, नागरिकांचा मागास प्रवर्ग – नवी मुंबई मनपा, पिंपरी-चिंचवड मनपा, औरंगाबाद मनपा, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) – मिरा-भाईंदर मनपा, जळगाव मनपा, सांगली-मिरज-कुपवाड मनपा आणि चंद्रपूर मनपा, सर्वसाधारण प्रवर्ग – लातूर, धुळे, मालेगांव, बृहन्मुंबई, भिवंडी-निजामपूर, अकोला, अहमदनगर, वसई-विरार मनपा. (एकूण आठ), सर्वसाधारण प्रवर्ग (महिला) – ठाणे, कल्याण-डोबिंवली, उल्हासनगर, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, नागपूर मनपा. (एकूण आठ) याप्रमाणे आरक्षण जाहिर झाले आहे.