ओबीसींना वेठीस धरू नका; तातडीने नोकर भरती करा

0

मुंबई: सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे राज्य सरकारने राज्यातील नोकर भरती थांबविली आहे. सुप्रीम कोर्टातील मराठा आरक्षणावरील सुनावणी पुन्हा चार आठवड्यांसाठी लांबली आहे. त्यामुळे नोकर भरती देखील पुढे ढकलली गेली आहे. मात्र यावर कॉंग्रेस नेते मंत्री विजय वडेट्टीवार चांगलेच संतापले आहे. ‘मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे, मात्र हे प्रकरण न्यायालयात असल्याने त्यास विलंब होणार आहे. तोपर्यंत इतर समाजातील विद्यार्थ्यांना वेठीस धरणे योग्य नसून शासनाने मराठा समाजाच्या जागा राखीव ठेवून राज्यातील नोकर भरती करावी’ अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा केल्याचेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

अनेक विभागातील नियुक्ता बाकी आहेत, एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या आहेत. भरती लांबल्याने अनेक उमेदवारांचे वय निघून जाणार आहे. शासनाने या गोष्टींचा विचार करावा अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. ओबीसींना वेठीस धरू नका अन्यथा ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल असा इशाराही मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

दोन दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणावर सुनावणी ठेवण्यात आली होती, मात्र ती चार आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे.राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत गंभीर नसल्याचे आरोप विरोधकांसह मराठा समाजातील संघटनांनी केले आहे. राज्य सरकार बाजू योग्य पद्धतीने मांडत नसल्याचे आरोपही होत आहे.

Copy