ओबामांची काळजी निरर्थक नाही!

0

बराक ओबामा यांच्यासारखे कणखर तितकेच कर्तव्यकठोर आणि जागतिक भान आणि जाण असलेले नेतृत्व आता अमेरिकेच्या अध्यक्षपदावरून पायउतार होत आहे. बुधवारी त्यांचे निरोपाचे भाषण झाले. या भाषणातून अमेरिकेच्या विद्यमान परिस्थितीसह पुढे काय वाढून ठेवले, याबद्दल त्यांनी कमालीची चिंता व्यक्त केली. ओबामांची चिंता ही खरे तर भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रासाठीही धोक्याचीच घंटा म्हणावी लागेल. नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे महाकरामती इसम असून, त्यांच्या रंगेलपणाबद्दल तर बोलावयास नको! त्यामुळे अमेरिकेच्या वाटचालीबद्दल सर्वांना वाटणारी काळजी निश्‍चितच निरर्थक नाही!

भारतातील निवडणुकांच्या गोंधळात एका महत्त्वपूर्ण घडामोडीकडे सगळ्यांचे दुर्लक्ष झालेले दिसते. भारताशी मैत्रीचा नुसताच हात पुढे न करता ही मैत्री विविध टप्प्यांवर यशस्वीपणे निभावणारे आपले जिगरी दोस्त बराक ओबामा हे अमेरिकेच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ज्यांनी केवळ समजूनच घेतले नाही, तर विविध पातळींवर खर्‍याखुर्‍या मित्रासारखी सोबत करत भारताशी भावनिक नाळही जुळवली. तत्पूर्वी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा जागतिक पातळीवर योग्य तो सन्मान ठेवत मैत्रीची अनोखी मिशाल प्रस्थापित केली. डॉ. सिंग यांची विद्वत्ता, अनुभव आणि पात्रता यांचा ओबामा यांनी नेहमीच आदर, गौरव केला. त्यांच्या या वर्तवणुकीने त्यांनी भारतीयांची मनेच जिंकली नाही, तर भारतच जिंकून घेतला होता. ओबामा यांनी बुधवारी शेवटच्या अध्यक्षीय भाषणातून अमेरिकन नागरिकांचा भावनात्मक निरोप घेतला. त्यांचे निरोपाचे भाषण हे खरे तर केवळ अमेरिकनच नाही तर या देशाची संबंधित अशा सर्वच घटकांसाठी चिंतेचा विषय ठरेल, त्यातून भारतही वगळता येणार नाही. काय म्हणाले होते ओबामा? ते म्हणालेत, वाढता वंशवाद, विषमता आणि राजकीय गोंधळाच्या स्थितीमुळे अमेरिकेच्या लोकशाहीला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या धोक्यापासून लोकशाहीचे रक्षण करण्याची जबाबदारी आता तेथील नागरिकांची असेल. जेव्हा सामान्य माणूस सक्रिय सहभागी होतो, तेव्हाच बदल शक्य असतो. माझ्या क्षमतेवर विश्‍वास ठेवा, असे मी तुम्हाला मुळीच सांगत नाही, तर तुम्ही आता स्वत:च्याच क्षमतेवर विश्‍वास ठेवा आणि अपेक्षित बदल घडवून आणा, असे आवाहन करताना त्यांना अमेरिकेच्या भवितव्याचीच काळजी वाटली.

खरे तर गेल्या आठ वर्षांत ओबामांनी त्यांच्या देशासाठी खूप काही करून दाखवले आणि भविष्यातही खूप काही ते करू शकणार आहेत. अमेरिकेत येत्या 20 तारखेला सत्तांतर होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा उनाडटप्पू राष्ट्राध्यक्ष आता अमेरिकेला लाभला आहे. या ट्रम्प महोदयाच्या स्त्रीलंपटपणाच्या अनेक सुरस कथा विविध प्रसारमाध्यमांद्वारे जोरदारपणे चघळल्या जात असून, त्या आवडीने चर्चिल्याही जात आहेत. खरे तर ट्रम्प यांना अध्यक्ष म्हणून स्वीकारण्यास अर्ध्या अमेरिकन नागरिकांची इच्छा नाही. मुळात ते अध्यक्ष झालेच कसे? याबद्दल अमेरिकन नागरिक यांच्यासह तेथील सर्वच समूहांना मोठे आश्‍चर्य वाटून राहिले आहे. तरीही ट्रम्प हे अमेरिकेचे अध्यक्ष असतील हे वास्तव आहे आणि ते भारतासह जगाला स्वीकारावे लागणारच आहे. ट्रम्प अध्यक्ष झाल्यानेच ओमाबांना अमेरिकेच्या भवितव्याविषयी काळजी वाटू लागली, ही काळजी समजण्यासारखी आहे. त्यामुळेच सर्वांनी यापुढे सतर्क राहण्याची गरज आहे. अंतर्गत आणि बाह्य धोका निर्माण झालेला आहे. लोकशाहीची मूल्ये जोपासण्याची जबाबदारी आता आपल्यालाच पार पाडावी लागणार आहे, असे सूचक उद्गार त्यांनी आपल्या अखेरच्या भाषणात काढले. ओबांनानंतरच्या सत्तांतरानंतर अमेरिकेत खरी लोकशाहीची परीक्षा सुरू होईल, असे संकेत आता मिळत आहेत. ओबामा यांच्या कार्यकाळात अमेरिका अतिशय मजबूत झाली. त्यांच्या सत्ताकाळात अमेरिकेवर एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही. इसिस या जागतिक दहशतवादी राक्षसाचा समूळ नाश करण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार आणि त्यात त्यांना येत असलेले यश पाहता, अमेरिकेला धोका पोहोचवण्याचे स्वप्न पाहणारा कोणीही सुरक्षित राहणार नाही, हे त्यांनी आपल्या कृतीतूनच सिद्ध केले आहे. एकीकडे ओबामा पायउतार होत आहेत तर दुसरीकडे ट्रम्प यांच्या सत्तारोहणासाठी नाराज असलेला अमेरिकन नागरिक आपली मानसिक तयारी करत आहे. त्यातच काल-परवा ट्रम्प आणि अमेरिकेतील गुप्तचर संस्था तसेच प्रसारमाध्यमांमध्ये यांच्यामध्ये युद्ध सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

ट्रम्प यांच्या धक्कादायक अशा सेक्स सीडीज रशियाच्या हाती लागल्या असून, त्या जगजाहीर झाल्या तर अमेरिकेची नाचक्की होईल, या धक्कादायक माहितीवरून ट्रम्प महोदय मात्र तेथील प्रसारमाध्यमांवरच आपली आगपाखड करण्यात धन्यता मानत आहेत. मीडिया आणि गुप्तचर संस्था यांच्यावर ट्रम्प इतके संतापलेले आहेत की याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, अशा धमक्या ते देत आहेत. गुप्तचर संस्था एफबीआय आणि सीआयएसह चार प्रमुख गुप्तचर एजन्सींनी ट्रम्प आणि ओबामा यांच्यासमोर गत आठवड्यात एक अहवाल सादर केला होता. अध्यक्षांच्या निवडणुकीत रशियाच्या हस्तक्षेपाबाबतचा हा अहवाल असल्याचे सांगितले जाते. वॉशिंग्टन पोस्ट या प्रतिष्ठित वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिल्यानंतर ट्रम्प यांनी ट्विटरद्वारे हे वृत्त खोटे असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काहीच वेळात त्यांच्या सेक्स सीडीचे प्रकरण चव्हाट्यावर आले. एकूणच काय तर अमेरिकेला आता प्रगल्भ आणि सर्वसमावेशक असा राष्ट्राध्यक्ष राहिलेला नाही. एका उनाड अन् रंगेल माणसाच्या हाती देशाची सूत्रे गेली आहेत. त्यामुळे अमेरिकेची लोकशाही धोक्यात आली आहे, जागृत राहा, असे ओबामा सांगून जात असतील तर अमेरिकेला काळजी करण्यासारखी बाब आहे, तद्वतच ती भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रासाठीही धोक्याची घंटा म्हणावी लागेल.