ऑस्ट्रेलियाला कमी लेखू नका – सचिन तेंडुलकर

0

मुंबई । ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत वर्चस्व गाठण्याची क्षमता आपल्या संघात आहेच, त्याबाबत कोणालाही शंका नाही; पण कांगारुंना कमी लेखण्याची चूक करू नये, असा सल्ला सचिन तेंडुलकरने विराटसेनेला दिला आहे. क्रीडा साहित्य तयार करणार्‍या स्पार्तन या कंपनीच्या कार्यक्रमात सचिन बोलत होता. ऑस्ट्रेलिया हा ताकदवर संघ आहे; पण भारतात भारताविरुद्ध खेळणे सोपे नाही, याची जाणीव त्यांना आहे. हेच भारतीय संघ सध्या करत असलेल्या प्रगतीला मिळणारी दाद आहे; पण आपली क्षमता कितीही मोठी असली, तरी प्रतिस्पर्ध्यांना गृहित धरू नये, असे सचिनने सांगितले. ऑस्ट्रेलिया संघाचा सामना करणे सोपे नसते; मात्र विराटसेनेवर माझा विश्‍वास आहे. प्रतिस्पर्ध्यांना कमी लेखण्याचा विचार आपला संघ करणार नाही आणि वेळ येताच आपले वर्चस्व सिद्ध करेल, असे सचिन म्हणाला.

फेडरर-नदालशी तुलना
ऑस्ट्रेलिया टेनिस स्पर्धेत रविवारी झालेल्या रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्यातील झुंझार सामन्याचा सचिनने या वेळी आवर्जून उल्लेख केला. दुखापतीनंतर हे दोघे खेळाडू पुन्हा अव्वल श्रेणीचे टेनिस खेळत आहे. मीसुद्धा अशाच दुखापतीचा सामना करून पुन्हा क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केली होती. 2005 मध्ये मला निवृत्त कधी होणार? असा प्रश्‍न विचारण्यात आला होता; पण त्यानंतर माझा सर्वोत्तम काळ आला होता, असे सांगताना सचिनने आपण फेडररचे जबरदस्त फॅन असल्याचे सांगितले.