ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानला व्हाईटवॉश

0

सिडनी : पाकिस्तानच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या जलद व फिरकी गोलंदाजीपुढे सपशेल नांगी टाकल्याने ऑस्ट्रेलियाकडून पाकिस्तानला तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्हाईटवॉश स्वीकारावा लागला. पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियाने २२० धावांनी पराभव करत तीन सामन्यांची मालिका ३-० अशी जिंकली. सिडनी मैदानावर झालेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला विजयासाठी ४६५ धावांचे आव्हान दिले. पाकने चौथ्या दिवसाअखेर १ बाद ५५ धावा केल्या होत्या.

गोलंदाजांसमोर भंबेरी
पुढे खेळताना पाकिस्तानचा फलंदाजांची ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर भंबेरी उडाली. जोश हेझलवूड व मिशेल स्टार्क या जलदगती गोलंदाजांनंतर स्टिव्ह नॉफ्की व नॅथन लिऑन यांच्या फिरकीपुढे पाक फलंदाज टीकू शकले नाहीत. पाकिस्तानकडून यष्टीरक्षक सर्फराज अहमदने प्रतिकार करत सर्वाधिक ७२ धावा केल्या. पाकिस्तानचा दुसरा डाव २४४ धावांत संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथला मालिकावीर आणि डेव्हिड वॉर्नरला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

सलग सहावा कसोटी पराभव
ऑस्ट्रेलियाला या विजयामुळे मोठा दिलासा मिळाला असून त्यांना यापूर्वीच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेकडून २-१ असा पराभव स्वीकारावा लागला होता. ऑस्ट्रेलियाचा हा सलग चौथा कसोटी विजय आहे. तर, दुसरीकडे पाकिस्तान संघाला ऑस्ट्रेलियामध्ये सलग १२व्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर, पाकिस्तानचा हा सलग सहावा कसोटी पराभव आहे. या पराभवामुळे पाकिस्तानचा संघ आयसीसी कसोटी क्रमवारीत पाचव्या स्थानावर गेला आहे. आता या दोन्ही संघांमध्ये पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे.

४६४ धावांचे लक्ष्य
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात अवघी ३२ षटके खेळून काढताना ७.५३ च्या सरासरीने २४१ धावा कुटल्या. पहिल्या डावातील शतकवीर डेव्हिड वॉर्नरने २७ चेंडूूंत ८ चौकार आणि ३ खणखणीत षटकारांची आतषबाजी करून ५५ धावा चोपल्या. कर्णधार स्टिव्हन स्मिथ (५९), उस्मान ख्वाजा (नाबाद ७९) आणि पीटर हॅण्ड्सकोम्ब (नाबाद ४०) यांनीही आक्रमक पवित्र्यासह फलंदाजी केली. ३२ षटकांत २ बाद २४१ धावांवर स्मिथने डाव घोषित करून पाकिस्तानसमोर ४६४ धावांचे लक्ष्य ठेवले होते.