ऑनलाईन सभेतील तांत्रिक अडचणींमुळे शिवसेना नगरसेवकांचा सभागृहात गोंधळ

0

सभेतील विषय कळत नसल्याचा आरोप ; सत्ताधारी भाजपा- शिवसेना आमनेसामने

जळगाव: तांत्रिक अडचणींमुळे महासभेतील कामकाज समजत नसल्याने विरोधीपक्ष शिवसेने सभागृहात येत आक्रमक भूमिकेत आयुक्तांसह महापौरांना ऑनलाईनचा आग्रह का? असा जाब विचारला. तसेच सभेत ऑनलाईन उपस्थित असलेल्या नगरसेवकांचे माईक सुरु असल्याने सभेतील विषय कोणालाही कळत नसल्याने विरोधी पक्षातील नगरसेवकांनी सभागृहात येत गोंधळ घातला. दरम्यान भाजपाच्याही नगरसेवकांनी सभागृहात येत ऑनलाईन सभेतील तांत्रीक अडचणींविषयी तक्रार मांडली.

महापालिकेची विशेष महासभा महापौर भारती सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी व्यासपीठावर उपमहापौर सुनिल खडके, आयुक्त सतिश कुलकर्णी, नगरसचिव सुनिल गोराणे उपस्थित होते. सुुरुवातीला महासभेच्या पटलावर असलेले अभिनंदनाचा ठराव महापौरांच्या आदेशानुसार पुढील सभेत मांडण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. त्यानंतर महासभेला सुरुवात झाली. महासभेत नगरसेवक आपल्या घरुनच मोबाईलवरुन ऑनलाईन सभेला उपस्थित होते. सभेच्या पटलावरील विषय वाचलनाला नगरसचिवांकडून सुरु झाली परंतु ऑनलाईन सभेत तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने सभेच्या सुरुवाती पासूनच सावळा गोंधळ सुरु होता. तसेच सभेच्या पटलावर वाचले जाणारे विषयच नगरसेवकांना समजत नसल्याने विरोधी पक्षातील शिवसेनेचे विरोधीपक्षनेता सुनिल महाजन, गटनेता बंटी जोशी, नगरसेवक प्रशांत नाईक, ईबा पटेल यांनी हातातील मोबाईल महापौरांसह आयुक्तांना दाखवित सभागृहात सुरु सभेत काय सुरु आहे काय नाही याबाबत विचारणा केली.

सत्ताधारी-विरोधक आमनेसामने
महापौरांनी विरोधकांना सभागृहात बसण्याची परवानगी देताच सत्ताधारी भाजपचे नगरसेवक कैलास सोनवणे, सचिन पाटील, चेतन सनकत, कुलभूषण पाटील, किशोर बाविस्कर हे देखल सभागृहात येत आम्हाला देखील सभेला बसू द्यावे अशी मागणी केल्याने सत्ताधारी व विरोधक समोरासमोर आल्याने सभागृहात चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर सत्ताधारी नगरसेवकांनी सभागृहातून काढता पाय घेतला तर विरोधीपक्षाने सभागृहात उपस्थित राहून ते सभेला उपस्थित राहिले. संपुर्ण राज्यभरातील महापालिकांमध्ये ऑफलाईन महासभा घेतल्या जात आहे. परंतु याच महापालिकेत ऑनलाईनचा आग्रह का धरला जात असल्याचा जाब गटनेता बंटी जोशी यांनी आयुक्तांना विचारला. त्यावर आयुक्तांनी त्या नगरसेवकांसोबत चर्चा करीत आमच्याकडून वारंवार शासनाकडे ऑफलाईन सभेतबाबत पत्रव्यवहार करुन पाठपुरवा केला जात आहे. परंतु कोरोनाच्या प्रादुभार्वामूळे त्यांच्याकडून ऑफलाईन सभेला परवानगी दिली जात नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

पक्षाचा विषय सभेत का?- सुनिल महाजन
विरोधीपक्षातील नगरसेवकांनी सभागृहात येत प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध केला. त्यानंतर विरोधी पक्षनेते सुनिल महाजन यांनी सत्ताधार्‍यांना तुम्ही पक्षाच्या बैठकीतले विषय सभेत का मांडत आहे असे म्हणत सत्ताधार्‍यांना धारेवर धरले. तसेच तुमचे पार्टी मिटींगमधले विषय इथे का मांडत आहे असे म्हणत सत्ताधारी केवळ त्यांचेच विषय सभेत मांडत असल्याचा आरोप देखील यावेळी केला

शौचालयाच्या विषयावर अ‍ॅड. हाडांचा यांचा आक्षेप
3 कोटी 34 लाख रुपयाच्या निधीतून पक्षाच्या बैठकीमध्ये 50 लाख रुपये शिवाजीनगरमध्ये शौचालयांसाठी मंजूर करण्यासाठी महासभेच्या पटलावर ठेवून तो सर्वानुमते मंजूर करण्याबात निर्णय झाला होता. हा ठराव महासभेत मांडल्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविका ऍड. शुचिता हाडा यांनी या ठरावावर आक्षेप घेतला. तसेच सेवाभावी संस्थांकडून ही शौचालये बांधण्यासाठी अनेकदा प्रस्ताव आले आहे हे काम त्यांच्याकडून करुन घेत या पैशांतून दुसरी कामे करण्याबाबत सूचना करीत आक्षेप घेतला. यावर नगरसेवक सचिन पाटील यांनी तुम्ही पक्षाच्या मिटींगमध्ये झालेला विषयाला का विरोध करीत आहे असे म्हणत त्यांच्यावर टिका केली. त्यानंतर हा विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
आयत्या वेळेसच्या विषयांना मंजूरी महासभेत आत्यावेळी मांडलेले 11 समितींविषयी, पोल हटविण्याचे काम महावितरणकडून नव्हे तर मनपाकडून करण्यात यावे, ठराव क्रमांक 404 विखंडीत करण्याचा ठराव यासह सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

Copy