Private Advt

ऐनपूरच्या महिलांना विळ्याचा धाक दाखवून लुटले

खिर्डी, ता.रावेर : नववर्षांच्या पहाटे मॉर्निंग वॉकला निघालेल्या तालुक्यातील ऐनपूरच्या महिलांना भामट्याने विळ्याचा धाक दाखवून लुटल्याची धक्कादायक घटना ऐनपूर ते खिर्डी रस्त्यावर घडल्याने महिलावर्गात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात निंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मॉर्निंग वॉकला जाणे पडले महाग
ऐनपूर येथील महिला संगीताबाई विजय पाटील, कल्पना सुभाष पाटील, अर्चना विनोद पाटील, मिराबाई श्रीराम पाटील या चारही महिला दररोजप्रमाणे शनिवार. 1 रोजी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी खिर्डी रस्त्याने निघाल्या. पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास खिर्डी रस्त्यावरील कॉलेजच्या पुढे एक किलोमीटर अंतरावर या चारही महिलांच्या समोर अचानक शेतातून अंदाजे तीस वर्षीय युवक आला व त्याने महिलांना विळ्याचा धाक दाखवत त्यांच्याकडील मंगळसूत्र व कानातील झुमके आदी दागिने धमकावून काढून घेतले. जिवाच्या भीतीमुळे महिलांनी दागिने काढून दिले व दागिने घेवून चोरटा केळीच्या शेतातून अंधाराचा फायदा घेत पसार झाला. सुमारे 63 हजार 200 रुपयांचे हे दागिने असल्याचे सांगण्यात आले.

पोलिसांची घटनास्थळी धाव
पहाटेची वेळ असल्याने व रस्त्यावर कुणीही येणारे-जाणारे नसल्याने महिला प्रचंड धास्तावल्या व त्यांनी घरी येवून हा प्रकार सांगितल्यानंतर निंभोरा पोलिसांना माहिती कळवण्यात आली. निंभोरा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल उनवणे तसेच हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर चौधरी व पथकाने घटनास्थळी धाव घेतली. फैजपूर डीवायएसपी कुणाल सोनवणे यांनी सुद्धा घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. निंभोरा पोलिस ठाण्यात महिलांच्या तक्रारीनुसार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. .तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर चौधरी, ईश्वर चव्हाण करीत आहे.