एस.टी.कर्मचार्‍यांच्या संपास जाहीर पाठिंबा

 

साक्री। अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील (बाबा) खंडापूरकर यांच्या आदेशाने धुळे जिल्हा अध्यात्मिक आघाडी यांच्यावतीने एस.टी. कर्मचार्‍यांच्या संपाला व उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे. अशा आशयाचे निवेदन साक्री तालुका आगार प्रमुख यांना देण्यात आले. संपासह उपोषणास तसेच वेळ आल्यास रस्ता रोको आंदोलनात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती धुळे जिल्हा अध्यात्मिक आघाडी सदैव एसटी कर्मचारी यांच्यासोबत राहील, असे धुळे जिल्हा अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष जितेंद्र बच्छाव, जिल्हाध्यक्ष अनिल देसले, विभागीय अध्यक्ष प्रवीण बोरसे, धुळे जिल्हा आदिवासी सेलचे अध्यक्ष रवींद्र ठाकरे, परिवहन विभागाचे जिल्हाध्यक्ष करुणा पाटील, तालुकाध्यक्ष ग्रामीण कारभारी अहिरे, तालुका संघटक चंद्रशेखर अहिरराव, तालुका मीडिया विभागाचे शरद चव्हाण यांनी जाहीर केले.

गेल्या कित्येक वर्षापासून एसटी कामगारांचे अतोनात हाल होत आहेत. तुटपुंज्या पगारावर त्यांना आपल्या संसाराचा गाडा हाकावा लागत आहे. खरेतर त्यांच्या केलेल्या मेहनतीच्या मानाने त्यांना खूप पगार कमी आहे. परिवहन महामंडळास राज्य शासनात समाविष्ट करण्यात यावे, ही त्यांची मागणी वास्तव आहे. तसेच राज्य परिवहन कर्मचारी यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या सर्व बाबींची दखल घेण्यात यावी, असेही निवेदनात नमूद केले आहे.