Private Advt

एसटी कर्मचाऱ्यांना दरडाऊन नव्हे तर समजाऊन सांगा

 मुंबई – एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्मचाऱ्यांना दरडाऊन नव्हे तर समजाऊन सांगावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी केले. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करून त्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या बरोबरीचा दर्जा आणि सोई सुविधा द्यायलाच हव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

 

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पुणे शहरात भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित ‘अटलशक्ती महासंपर्क अभियाना’ची सुरुवात मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात एका घरात संपर्क साधून केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

 

पुणे शहरातील तीस हजार कार्यकर्त्यांनी प्रत्येकी दहा घरांमध्ये संपर्क साधून मोदी सरकारच्या कामाविषयी आणि भारतीय जनता पार्टीविषयी माहिती देणे असे या अभियानाचे स्वरूप आहे.

 

मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्या परखडपणाचा अभिमान आहे. पण त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना विलीनीकरण डोक्यातून काढून टाका असे धुडकावल्यासारखे सांगू नये. विलीनीकरण का शक्य नाही हे समजून सांगावे. जीवन प्राधिकरणाचे विलीनकरण केले तरी एसटीचे का करता येत नाही, हे सुद्धा समजून सांगावे.