एलसीबी पोलिस असल्याचे सांगत लुबाडले

0

धुळे: शिरपूर तालुक्यातील होळनांथे येथे राहणारे प्रविण राजपूत हे काल कामानिमित्त धुळ्यात आले असता दोघा अज्ञातांनी त्यांना एलसीबी पोलिस असल्याचे सांगत त्यांना लुबाडल्याची घटना भर दिवसा घडली. पोलिसात तक्रार केल्याने गुन्हाही दाखल झाला आहे. होळनांथे येथील प्रविण ऊर्फ बापूसाहेब रविंद्रसिंग राजपूत हे ४२ वर्षीय इसम काल दुपारी १२ वाजता देवपूरातील जीटीपी स्टॉपजवळ महालक्ष्मी मंडप डेकोरेटर्स शेजारी उभे असता दोन अज्ञात इसम त्यांच्याजवळ आले.

देवपूरात चोर्‍या वाढल्या असून तुम्ही तुमच्याजवळील सोन्याची चेन व अंगठी काढून पिशवीत ठेवा असे सांगत त्यांनी गळ्यातील चेन व हातातील अंगठी काढावयास लावली. त्यानंतर या वस्तू पिशवीत ठेवल्या आहेत की नाही पाहू द्या असे म्हणत त्यांनी हातचलाखी करुन या वस्तु लांबविल्या. चोरीस गेलेल्या सोन्याची किंमत २७ हजार रुपये इतकी असून आपण लुबाडले गेलो आहोत हे लक्षात येताच प्रविण राजपूत यांनी देवपूर पोलिस स्टेशन गाठून रितसर तक्रार दिली. त्यानुसार दोघा अज्ञातांवर गुन्हा दाखल झाला आहे.